Friday, 13 March 2026

सध्या मी वादविवाद टाळत आहे

सध्या मी कुठल्या ही वादात भाग घेत नाही. 

तुम्ही बरोबर आहात की नाही हा प्रश्न नाही पण आजकाल वादविवाद तथ्यापेक्षा भावनिक (based on sentiments and emotions driven by political and or religious sentiments) मार्गाकडे वळलेला आहे असं मला राहून राहून वाटतं. वाक्याची सुरवात " मी हिंदू आहे पण .." असं कधीपर्यंत चालू ठेवायचे? प्रश्नच आहे. 

काहीवेळा बोलण्या मध्ये भाग घ्यावाच लागतो. काही वर्षांपूर्वी एक मित्र मुंबईच्या घरी आला. त्याला घेऊन रहेजा पार्क मध्ये गेलो. परम भक्त होता. त्याला पण हरकत नाही. कोणी कुणाचा भक्त व्हावा हा ज्याचा त्याचा  वैयक्तिक मामला. मी आपला चालता चालता फक्त हुंकार भरत  होतो. त्याला ह्याची सवय नसावी. मर्क पासून सुरवात केल्यानंतर तो देशातल्या एका प्रमख फार्मा कंपनीचा Vice प्रेसिडेंट झाला होता. कंपनीत व इतर मित्र मंडळी मध्ये हुद्या मुळे कौतुक असतं एक तर किंवा कशाला उगाच असं मनातल्या मनात म्हणत होकार देण्याची सवय आपण रुजुवून घेतलेली असते. ती आपल्या अंगवळणी पडते. अश्या "हो-कार्याना" पूर्वीच्या राजदरबारी भाट असे संबोधले जायचे, आजकाल काय म्हणतात ह्याची माहिती नाही. पण मी काहीच अभिप्राय देत नाही म्हटल्यावर त्याचा तिळपापड झाला असावा. घरी आलो. जेवण करताना त्याने तोच धागा पुढे सुरु केला. मी गप्प. त्याने राग गिळून माझ्या कडे पाहिलं, म्हणाला, मी वेड्यासारखा बडबड करत आहे पण तू काहीच रिस्पॉन्स देत नाहीस. मी तुझ्या घरी आलेलो  आहे आणि तुझा हा व्यवहार? मी त्याला सांगितलं, तू माझ्या घरी आहेस म्हणून तर मी वादात पडत नाहीये. तुझी मतं मला मान्य आहे की नाही हा प्रश्न नाही. पण मी त्या मतांना प्रत्युत्तर दिलं तर तू म्हणशील मी तुझ्या घरी अशासाठीच आलो होतो कां? लेट्स कीप इट सिम्पल. तुला माझी मतं माहित नाही अशातला भाग नाही. पण उगाच कशाला खाजवत बसायचं.  

त्यानंतर त्या तथाकथित मित्राने माझ्या कडे किनारा केला.   

परवाची गोष्ट. घरी एक पाहुणा आलेला. अमेरिका इराण युद्ध सुरु आहे. घरच्या - परिवारातील अत्यंत फालतू प्रश्नापेक्षा हा प्रश्न तसा बरा. युद्धाची प्रत्यक्ष झळ काही आपल्याला लागत नाही. त्याने सुरवात केली. म्हणाला बरं झालं एकदाची इराणला अद्दल घडवायला पाहिजे होती. मी आपला गप्पच. म्हणाला, तुम्ही इतके लिहिता वाचता ह्यावर तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. मी म्हटलं, काय बोलू? पण बोलण्यात भाग घ्यावाच लागतो कारण पाहुणा घरी आलेला. बोललं नाही तर पंचायत आणि बोललं तर महापंचायत (?) 

त्याच्या बोलण्याचा सार असा होता - आणि मंडळी हो, हा सगळा गुणा -भाग सात-चोवीस सुरु असलेल्या माध्यमावर  - टीव्ही व समाज माध्यमे (Social मीडिया) वर आधारित होता. भरीस भर म्हणून इराण हे मुस्लिम राष्ट्र. इस्राएल हा त्यांचा शत्रू. मुस्लिम असल्यामुळे इराण हा आपला शत्रू व शत्रूचा शत्रू (इस्राएल) हा आपला मित्र. हे लॉजिक तसं सुटसुटीत - मागच्या काही वर्षांपासून त्याची पाळंमुळं बरीच खोलवर गेलेली.  

त्याच्या बोलण्यातून हे ही आलं: इराण अणुबॉम्ब बनविण्याच्या मार्गावर होता. मी विचारलं: मग? मग काय म्हणता? सगळ्या जगाला त्याचा धोका होता. आपण पण सुटलो नसतो. मनात विचार केला कुठं इराण आणि कुठं भारत ! पण त्याचं काय चुकलं? अमेरिकी पंतप्रधान जेव्हा घसा फोडून सांगतो की इराणकडे अमेरिकेपर्यंत डागू शकणारी मिसाईल आहेत तर हा तर आपला साधा-सुधा  महिंद्रा मधून रिटायर झालेला कर्मचारी. 

मी त्याला म्हटलं आपल्याकडे पण अणुबॉम्ब आहे. तो जरा भांबावला. मी तो धागा थोडा अजून सैल केला. पाकिस्तान कडे पण अणुबॉम्ब आहे. चीन, नॉर्थ कोरिया कडे पण अणुबॉम्ब आहेत. ब्रिटन आणि फ्रान्स जे ह्या युद्धात अप्रत्यक्ष सहभागी झाले, ज्यांनी व युरोपातल्या त्यांच्या इतर मित्र राष्ट्रांनी इराणकडे अणुबॉम्ब असता कामा नये असं वारंवार सांगितलं व अजून ही सांगत आहेत, त्यांच्याकडे पण अणुबॉम्ब आहेत. इस्राएल, ज्याने हा सगळा  कांगावा केला (इराणच्या अणुबॉम्बचा) त्यांच्याकडे पण अणुबॉम्ब आहे. इराण कडे अणुबॉम्ब नाही असं IAEA (International Atomic Energy Agency) सांगतं तरी हे ऐकत नाही आहे. 
 
पण समजा असलाच तर काय हरकत आहे? 

हे म्हणजे गावातल्या पाटलाकडे बंदूक असली तर चालते पण इतरांकडे असू नये. कारण? पाटलाची बंदूक शांततेसाठी व ऐऱ्या गैऱ्याची? 
 
किंवा एखाद्या श्रीमंत पोराकडे महागडं खेळणं असावं पण इतरांकडे ते असू नये असं नाही का हे.  
   
इराणचा काही भरवसा नाही. तो कधी कुणावर अणुबॉम्ब टाकेल हे सांगता येत नाही. त्याला युद्धाची खुमखुमी आहे. मला हसू आवरेना. म्हटलं, आतापर्यंत दोन अणुबॉम्ब टाकले गेले - पर्ल हार्बर वर जपानी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अमेरिकेने पहिल्यांदा हिरोशिमावर ऑगस्ट ६ ला व नागासाकी वर ऑगस्ट ९ ला. ह्या अणुबॉम्ब मध्ये अडीच लाखापेक्षा जास्त निरपराध लोक मारली गेली व नंतरच्या रेडिएशन मध्ये हजारो लोक मृत्यू यातना भोगत मरण पावली. अमेरिके शिवाय आतापर्यंत कुठल्याही राष्ट्राने अणुबॉम्ब चा वापर केलेला नाही. 

पाहुणा थोडा हिरमुसला. मुस्लिम द्वेष त्याच्या हृदयात ठाण मांडून बसलेला. लॉजिक, तथ्य, बाकी इतिहास (बादल सरकारचं ह्याच शीर्षकाचं नाटक आहे) त्याच्या हृदयापर्यंत पोचतच नव्हते. एक बांध हजारो बांध-बंधीस्ती. ह्यालाच डॉक्टरच्या भाषेत heart blockages म्हणत असावे (ज्याने heart attack होऊ शकतो, नाही?)     

आतापर्यंत इराणने कुठल्याही देशावर प्रत्यक्ष आक्रमण केलेलं नाही. पण अमेरिका, इस्राएल, इंग्लंड व युरोप? उदाहरणार्थ व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक, युक्रेन यादी बरीच आहे. पण पाहुणा माघार घ्यायला तयार नव्हता. इराणने आपल्या मित्र राष्ट्रावर हल्ले करायला नव्हते पाहिजे. मित्र राष्ट्र म्हणणं चुकीचं आहे हे मी त्याला नाही सांगितलं. मुस्लिम राष्ट्रं बहुतेक त्याला म्हणायचं असेल. मी त्याला हे नाही विचारलं: शाळेवर बॉम्ब टाकला तो वॉर क्राईम नाही पण इराणने अमेरिकेचे तळ जिथे आहेत त्यावर हल्ले केले तर त्याचं चुकलं. युद्ध तुम्ही सुरु करायचे आणि ज्याच्यावर हल्ला होतो त्याने कसं वागायचं हे पण तुम्हीच ठरवायचं. इजारदारी किंवा साम्राजवाद ह्यालाच म्हणत असावं कां? 

इस्राएल अमेरिकेने इराणवर हमला करायचा  पण इराणने प्रतिहल्ला करायचा नाही. इंग्लंडने आपले ऍसेट्सचं सरंक्षण करण्यासाठी आपले दोन तळ वापरायला (व युद्ध नौका) द्यायचे. दुसऱ्या देशात तुमचे ऍसेट्स हे मोठं प्रश्नचिन्ह आहे (सामंतवाद की वसाहतवाद)? इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, युरोप ह्यांचे तळ मध्य पूर्व व इतरत्र; त्यांचे ऍसेट्स मध्य पूर्व व इतरत्र. हा काय प्रकार आहे असे असंख्य प्रश्न होते जे त्या पाहुण्याला मला विचारायचे होते. पण नाही विचारले.                         
 
इराण मुस्लिम देश असून सुद्धा आपला मित्र देश आहे हे पण त्याला सांगायची गरज मला भासली नाही.          

मी त्याला म्हटलं, प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं अशी एक म्हण आहे. तसंच काही हे असावं नाही. म्हटलं, वाद कशाला घालत बसायचं!   वादविवाद तथ्यांवर करायचे दिवस कालबाह्य झालेत. वादविवाद सकारात्मक असतात हे पण कालबाह्य झालेलं आहे. जेव्हा एकमेव सत्य तलवारीच्या (किंवा बंदुकीच्या किंवा सत्तेच्या ) धारेवर संक्रमण करते तेव्हा जी.ए.कुलकर्णीच्या काजळमाया कथासंग्रहातील विदुषक कथा आठवते. त्या मध्ये कावळे व राजहंसाच्या उपकथेतील खारीची आठवण येते - इवलीशी खारुताई सत्य सांगत होती पण सत्य कुठं, कधी, कोणासमोर सांगावं हे व्यावहारिक ज्ञान तिच्याकडे नव्हते. राजहंस आणि कावळ्याच्या युद्धात सत्य सांगणारी खार मारली गेली.   

आजकाल जेव्हा जेव्हा वादविवादाचे प्रसंग येतात तेव्हा विदूषक आठवतो, कावळे आठवतात, खार आठवते. जी. ए. आठवतो.  

सध्या मी वादविवाद टाळत आहे.              

कुठेही युद्ध चालू असुद्या. अमेरिका, इराण, युक्रेन किंवा घरी. पूर्णविराम.

No comments:

दोस्त दोस्त ना रहा

" तुमच्या मित्रांची नावे   सांगा ." बाळूमामा,  यादी खूप मोठी आहे . कुठून सुरवात करू ? " मला वाटलंच . आमची ही ...