Sunday, 19 April 2026

चुना कसा लावायचा

"चुना कसा लावायचा." 

दुपारी जेवण करून थोडं आडवं व्हावं इतक्यात बाळुमामाची एन्ट्री. 

"तुम्ही परत आल्याचं कळलं." 

त्यात काय नवल. 

"नाही म्हणजे दोन तीन आठवड्यात येऊ असं तुम्ही म्हणाले. वाटलं आपले तीन चार रविवार वाया गेले. पण नाही." 

मुंबई दर्शन केलं की काय? तसं तिकिटे फाडता फाडता  अक्खी  मुंबई पालथी घातली असेल. नाशिक शिर्डीला जाऊन आले असाल.  

"किती वेळा दर्शन करायचं. देव पण कंटाळायचे आपलं थोबाड वारंवार पाहून."

मग? 

"ते जाऊद्या. सांगा चुना कसा लावायचा." 

चुना लावण्यासाठी पानाची गरज असते बाळूमामा. 

"तेच तेच. कुठलं पान घेऊ." 

पाने आठवण्याचा प्रयत्न केला म्हटलं, कपुरी चालेल. तसं काळं पान पण चांगलं असतं डायजेशन साठी. मद्रासी थोडं मसालेदार तर बंगाली तिखट. 

"तुम्ही शेवटचं पान खाल्लं त्याला किती दिवस झाले?" 

आठवत नाही बरेच दिवस झाले. दोन चार तर नक्की. 

"तेच, तेच. तुम्हाला वेळेचं आणि काळाचं भान नाही." 

बाळूमामा ! 

"मी नाही म्हणत..." 

असं कोण म्हणतो ? 

"ते जाऊद्या. उगाच किटकिट नको." 

पान न खाता माझा चेहरा लालबुंद झाला असावा 

"साहेब असं वाईट वाटून घेऊ नका. पानाचे प्रकार आता बदलेले आहेत." 

ते कसं शक्य आहे. 

"ते विचारू नका. मद्रासी कपुरी बंगाली इतिहास जमा झालेत. तात्या विन, तात्या ग्रीन, तात्या इरिन ही चलती नाणी आहेत." 

तात्या विन? आपल्या तात्यावरून पानाचे प्रकार सुरु झालेत? आपले तात्या भारीच लोकप्रिय झालेले दिसतात. खिडकीत बसून सुद्धा ग्रेट होता येतं हे तात्यांनी खिडकीत बसून दाखवलं

"तात्या म्हणजे आपले वरच्या खिडकीतील तात्या नव्हेत." 

तर?

"अमेरिकेतील तात्या टोपीवाले." 

"तात्या टोपे तर स्वातंत्र सेनानी..! 

"अहो टोपे आणि टोपी यात फरक आहे. तुमचं मराठी थोडं कच्चं आहे. काना सरळ असतो मात्रा सरळ पण तिरपी असते. वेलांटी टोपी घालते." 

व्यवहारात आपण तोकडं आहोत याची कल्पना होती पण व्याकरणात?  

"इंग्रजांना टोपी बहाद्दूर कां म्हणायचे?" 

ते विशिष्ट प्रकारची टोपी वापरायचे.

"बरोबर. टोपी थोडी तिरकी, आणि वेलांटीदार असली म्हणजे सुबक वाटते. घालायला सोपी आणि ज्याला घातली गेली तो गदगद. त्याला भरून येतं. आनंद असा उफाळून येतो काही सांगू नका. मालकाने सांगितलं हा तुमचा दुश्मन. झालं, तलवार चालली. खिडकीत बसून युद्धाची सगळी मजा लुटता येते. युद्धातील लूट समोरच्या दरवाज्यातून थेट खजिन्यात. मज्जाच मज्जा." 

बाळूमामा चुन्यावरून टोपी वर आलेले. दोन आठवड्यात बराच फरक पडलेला जाणवला. 

"तर मी काय म्हणत होतो, चुना कसा लावायचा?"

पाने आठवली म्हटलं हे तात्या विन, तात्या ग्रीन, तात्या इरिन काय प्रकार आहे. ही तर कीटकनाशक पाकिटावरची  नावे वाटतात.

"अशी वैविध्य पूर्ण पाने खाल्ली तर पोट साफ. पचनक्रिया सुबक होते." 

तुम्हाला हे चुन्याचं कसं काय आठवलं? 

"तुम्हाला चुना लावता येत नाही साहेब." 

तुम्हाला मी काय पानपट्टी वाला वाटलो कां? 

"मी असं नाही म्हणालो." 

कोण म्हणतो? 

"तुमची मुलगी. मागच्या रविवारी तुम्ही आले कां पाहायला आलो तर मामा बसा म्हणाली कॉफी पाजली. थोड्या गप्पा टप्पा झाल्या. म्हणाली, आमचे पप्पा एकदम बावळट आहे. त्यांना चुना पण लावता येत नाही." 

बावळट म्हणाली?

"प्रेमानं  हो साहेब. तिला तुमचं भलतंच कौतुक. म्हणते आमचे पप्पा टोपी घालत नाही."

एखाद्या कार्यात टोपी घालावी लागते. तिच्या लग्नात बहुतेक घालावी लागेल, म्हणा.  

"तेच तेच. मी पण हेच म्हटलं. तर तिने उदाहरणे दिली. खरंच हो साहेब. एकदम फिट्टंफाट आणि सांगतो साहेब खूप खूप कौतुक आहे तिला तुमच्या कामाचं. गणित शिकवतात, चुना कसा लावायचा हे पण गणितच आहे की नाही? म्हणाली, थोडाफार चुना कसा लावायचा हे पण गणित यायला पाहिजे."  

पोरगी कौतुक करते हे ऐकून बरं वाटलं. 

"तुमच्या तात्यांना बघा. सगळ्यांना टोप्या घालतो, खिडकीत बसून इशारे करतो. खालचे चेंडू फेकतात, बॅटा चालवतात. हा आपला खिडकीत बसून स्टॉक वर खाली आणतो. कित्ती गल्ला जमवला म्हणते मी." 

"इंग्रजासारख्या तिरक्या वेलांटी दार टोप्या घातल्या शिवाय कां कुबेराचा धनी होता येतं?"

मी गप्प. पोरगी कौतुक करते? दुर्बलता दाखवते? 

"मी जायला निघालो तर म्हणाली, मामा, आमच्या पप्पाना चुना कसा लावायचा हे जरा शिकवा ना? थोडी फार बरकत चालते की."  

"साहेब, मी विचार केला. पोरगी म्हणते तर प्रयत्न करायला काही हरकत नाही." 

"ही आयडिया मी आमच्या मंडळींना सांगितली. तिचं डोकं भन्नाट या सदरात मोडते की फुटते हे काही सांगता येत नाही, म्हणाली 'एकच कां? असे बरेच असतील की हो बिनडोक.' एक ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन टाका." 

"तिच्या आग्रहाखातर हे पत्रक मी तयार केलं." 

"तुम्हाला शिकवायचं तर तयारी करावी लागेलच. म्हटलं तात्याच्या गंगेत आपण पण हात धुऊन घेऊ की." 

मी पत्रक हातात घेतलं. 

"भव्य ऑनलाईन प्रशिक्षण

फक्त १९९ रुपयात घरी बसल्या बसल्या 

आत्ताच नोंदणी करा 

या क्षेत्रातले दिग्गज मार्गदर्शक 

तात्या टोपीवाले खिडकीकर यांच्या कडून शिका आणि लगेच कमाई करा. 

पहिल्या हजारांना चुना फ्री मध्ये दिला जाईल.     

'चुना कसा लावायचा'

 

Friday, 3 April 2026

दोस्त दोस्त ना रहा

"तुमच्या मित्रांची नावे सांगा."

बाळूमामा, यादी खूप मोठी आहे. कुठून सुरवात करू?

"मला वाटलंच. आमची ही मला विचारते, तुमचे जवळचे मित्र कोण आहे? मी पण तिला म्हटलं, यादी खूप मोठी आहे. कुठून सुरवात करू? तर म्हणाली, कुठूनही सुरुवात करा. तर साहेब, कुठूनही सुरुवात करा बघू."

शाळेतल्या मित्रांपासून करू?

"मला वाटलंच होतं. मी पण तसंच सांगितलं तर अशी हसली - काय म्हणता ते?"

खोडकर? व्यंगात्मक? 

"खोडकर समजले हे व्यंगात्मकचा अर्थ समजून सांगा.?" 

कसं सांगू. कठीण आहे. 

"सोपं करून सांगा.  एखादं उदाहरण देऊन सांगा हवं तर. तुमच्याकडे उदाहरणांना काय तोटा?"

आता असं समजा मी म्हटलं, 'मी मोलभाव करण्यात हुशार आहे'.

बाळूमामा पटकन हसले. 

हेच. हे हसणं व्यंगात्मक.  

"न बोलता टोला मारणे म्हणजे व्यंगात्मक तर. लय भारी." 

माझी अस्वस्थता मोलभाव करण्याच्या पुढं गेलेली 

"मग ती व्यंगात्मक हसली असेल नाही?"

व्यंगात्मक हसली? कां. बरं? 

"मी पण तिला हेच विचारलं तर म्हणते, एखादं नाव सांगा जो शाळेपासून आतापर्यंत तुमच्या सतत संपर्कात आहे. मी बरंच डोंक खाजवलं पण एक नाव ओठावर येत नव्हतं. तुम्ही सांगा की हो साहेब. तुमचं थोडं वेगळं असेल. तुमचे शाळेपासूनच जिवाभावाचे बरेच मित्र असतील नाही. त्यांना तुमची सतत काळजी आणि तुम्हाला त्यांची."

नावे आली गेली एकही स्थिरावलं नाही. 

"नाती फेविकॉलन जोडता आली असती तर कित्ती मजा आली असती नाही?"

असं ती म्हणाली?

"हो. वेळ आणि काळ. आपण कितीही व्हाट्सअप व्हाट्सअप केलं तरी नसलेली नाती अशी जुळतात कां हो?"

तुटलेली थोडं योग्य नाही कां बाळूमामा? शाळामित्र मित्र होते की त्या काळी. 

"शाळा सुटली पाटी फुटली ही म्हण आठवते कां, असं आमच्या हिचं म्हणणं. तिला बऱ्याच म्हणी तोंडपाठ आहेत तुमच्या सारख्या." 

कॉलेज मध्ये असतानाचे काही मित्र होते. काही भांडण नाही काही धुसपूस नाही. नोकरीत असताना पण काही जिवाभावाचे मित्र झाले.

"मित्र ही संकल्पनाच तशी रोमँटिक आहे ऋषिकेश मुखर्जीच्या पिक्चर सारखी , असं आमची ही म्हणाली."

सुदाम्याचे पोहे आठवले. कृष्ण आणि सुदामा?

"पौराणिक कथा शाळेतल्या पोरांना उदाहरण देण्यासाठी उत्तम असतात. वास्तविक जीवनात कमीच कामाला येतात. एकाद्या श्रीमंत मित्राने आपल्या शाळा मित्राला उद्योग धंदा करण्यासाठी पैशाची मदत केली असं एखादं उदाहरण द्या; हे पण तीच म्हणाली बरं कां साहेब. पण तुम्हाला मी विचारतो, असं आहे कां एखादं उदाहरण?"

आहे की बरीच. मागच्याच महिन्यात मी कुठेतरी वाचलं होतं असं एक उदाहरण.  

“वाचलेली सांगू नका. तुमच्या जवळचे  तुमच्या आसपासचं उदाहरण सांगा ना." 

डोक्यावरचे नसलेले केस चिमटीत पकडून आठवण करायचा प्रयत्न केला. विफल. स्मृतीभंश तर नाही झाला आपला?   

म्हटलं, जाऊद्या. आपण मुद्यावर येऊ. 

"आमच्याकडचा गॅस संपला. इराणचं युद्ध सुरू झाल्यापासून ही सतत माझ्या मागे लागली होती, एक्स्ट्रा सिलेंडर आणून ठेवा, आणून ठेवा. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मादुरोला कसं चुटकी सारखं एका रात्रीत उचललं. इराणला फार तर एक आठवडा लागेल. ही सांगत होती इराण म्हणजे व्हेनेझुएला काय म्हणतात तो देश नाही. मी तिला डिवचत गेलो. म्हटलं, तू तर एकदम युद्ध या विषयावरची एक्स्पर्ट झालेली दिसते. ती थोडी हिरमुसली, आणि शांत झाली. तिचा मुड ठीक करण्यासाठी मी म्हटलं, अगं आपले इतके मित्र आहेत. संपलाच तर हा अस्सा घेऊन येतो. भाजी चिरून होईपर्यंत सिलेंडर हजर."

आता? 

"महिना झाला. दुसरा महिना सुरु झाला. ट्रम्प हैं तो मुमकिन हैं असं वाटणारा मी एकटाच नव्हतो बरं कां."

आणखीन कोणी होते कां आपल्याकडचे. मी थोडं डिवचण्याचा उद्देशाने विचारलं. 

"आपल्याकडचे घ्या किंवा तिकडचे घ्या. इराणवर हमला झाला तेव्हा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यापैकी एकानेही ब्र पण नाही काढला. इंग्लंडने नाही नाही म्हणत विमानतळ दिलाच की हो."

स्व-रक्षणासाठी.  

"स्व-रक्षण गेलं चुलीत.इंग्लंड वर काही हमले होत नव्हते. कशाचं स्व-रक्षण. बोलण्याची चतुराई. अंग्रेज लोकं लय भारी या कलेत."         

मी थोडा बुचकळ्यात पडलो. बेस्टचा कंडक्टर आणि इतकी विचारात स्पष्टता! 

"आपल्याकडचे इंग्रजी बोलणारे लोकं पण या कलेत लय भारी असतात बरं कां साहेब."

मी पण बोलतो की इंग्रजी असं म्हणावं इतक्यात बाळूमामा म्हणाले:

"काही अपवाद आहेत बरं कां, तुमच्यासारखे." 

असं म्हणत बाळूमामा हलकेच हसले. खोडकर होतं की व्यंगात्मक?

"तर मी काय म्हणत होतो, एखादा मित्र सांगा की राव, गॅस देणारा."

मला काही आठवेना. 

"अशावेळी मित्र कामी नाही येत. ब्लॅक मार्केट मध्ये तीन हजाराला एक मिळत आहे. हिम्मत असेल घेऊन या आता. तिथं पण रांगच रांग लागलेली बरं कां. असं ही म्हणाली. मग हळूच म्हणाली, कल्लूला फोन केला तर दोन हजारात घरपोच येतो म्हणतात."

"कल्लू? मी किंचाळलो. त्या फडतूस गँगस्टरला फोन करू? डोकं जाग्यावर आहे कां तुझं? मी पाहतो, बरेच मित्र आहेत की आपले बऱ्या वाईटात सोबत देणारे." 

"काल त्याचा फोन आला होता (असं ही म्हणाली). 'अहो वहिनी, आमच्या मित्राला सांगा की झालं गेलं विसरून जा.  त्याने इतक्या  शिव्या दिल्या पण मी म्हटलं, आपला गावचा आहे शेवटी. त्यानं गँगस्टर आहे असं फक्त आकाशवाणीवर सांगायचं बाकी होतं. अहो टोल कोण घेत नाही. त्याऐवजी सेवा देत असतो आपण, एक खडा सापडणार नाही. पण बाळ्याचं आपलं नेहमीचंच. दूध से धुला हुआ. त्याच्या तूसडेपणावर काही इलाज नाही. तुम्हाला काय सांगायचं. तुम्ही तर दररोज झेलता."

कल्लूचा फोन तुमच्या बायकोला? 

"पुढं म्हणाली, तुम्ही म्हणजे वरच्या दादासारखे. थोडं पण वाकत नाही. त्या मॅक्रोनला बघा. मी विचारलं, हा मॅक्रोन कोण? तर म्हणते, काल कोरियाला गेला आणि मित्र ट्रम्प वर अशी आग ओकली की त्यांचं तेलाचं जहाज होर्मूझ वरून फ्रान्स कडे रवाना झालं." 

अरे, ट्रम्प एकटा पडला नाही. स्पेन पहिलेच आऊट झाला. इटली पण आऊट. मित्रमंडळातून. पोलंड पण बाहेर पडेल. 

"साहेब, ही म्हणाली, मित्र टेबल वरचे . रात्र संपली बात संपली. घ्या नास्ता करा."

गॅस भेटला? काय आश्चर्य. 

"म्हणाली, कल्लुदादांनी स्वतः रिक्षात घालून पाठवून दिला. पैशे पण घेतले नाही. फोन केला तर म्हणाले, 'अहो वहिनी, पैशाचं काय लावलंय. आपण मित्र नसलो तरी काय झालं, भावकीतले आहोत.  आमच्या बाळूला खमखमीत नास्ता खाऊ घाला'. आज मस्त पैकी मिसळ खाऊन आलोय. तुमच्या साठी आणली असती पण माहित नाही तुम्हाला चालली असती की नाही, कल्लूने पाठविलेल्या गॅस वरची."        

दोस्त दोस्त ना रहा. 

 

चुना कसा लावायचा

"चुना कसा लावायचा."   दुपारी जेवण करून थोडं आडवं व्हावं इतक्यात बाळुमामाची एन्ट्री.  "तुम्ही परत आल्याचं कळलं."  ...