बाळूमामा दरवाज्यावर.
आज रविवार नाही तरीही?
काय बाळूमामा? आज रविवार नाही.
"माहित आहे."
तब्येत वगैरे ठीक आहे ना?
"आमच्या तब्येतीला काय कारीट फुटलं?"
नवीन म्हण आहे वाटतं.
"जुन्या म्हणी काय कामाच्या. जुन्या माणसासारख्या. म्हटलं, आपण पण एक म्हण ठोकून द्यावी. आवडली? पुढच्या ब्लॉग मध्ये टाका."
"आता दरवाजा पूर्ण उघडाल की मी धक्का देऊ."
बाळूमामा आत आले. आराम खुर्ची वर बसले. म्हणाले, लॅपटॉप करा बाजूला.
पण बाळूमामा आज रविवार नाहीये
"सकाळी सकाळी झोकून तर आले नाही ना? हा तुमचा न विचारलेला प्रश्न."
"अहो साहेब, आज रामनवमी. सुट्टीचा दिवस."
तुम्हाला पण.
“आम्हाला कां नाही? बँका बंद. शासकीय कार्यालय बंद. बेस्टने काय घोडं मारलं?"
अत्यावश्यक सेवेत मोडतं बेस्ट. लोकल सारखं.असं मला वाटतं.
“शासकीय सेवा अनावश्यक सेवेत मोडते हे आज कळलं. द्यन्यवाद हा प्रकाश टाकल्या बद्दल!”
बेस्ट सेवा तर चालू आहे. रविवारी पण चालू असते.
"इराणने फेऱ्या कमी केल्या हो साहेब. जरा खोली बाहेर पडा. 922 किती मिनिटांनी येत होती पूर्वी आणि आता किती मिनिटांनी येते? काही अंदाज?
बरेच दिवस झाले बस प्रवास नाही झाला. दर पंधरा मिनिटांनी एक फेरी असावी असा अंदाज होता.
"फेऱ्यात फेरफार झाला. साधारणतः फेऱ्यांचे प्रमाण साठ टक्क्यावर आलं."
काय सांगता? अजून पब्लिक बोंबलत कशी नाही
"पब्लिक मोबाईल मध्ये घुसून आहे साहेब. हे पूर्व-पेड आणि पश्चिम पेड व्यसन आहे साहेब."
हे आवडलं. पूर्व आणि पश्चिम पेड. पूर्व म्हणजे मागील जन्माचं, आणि पश्चिम म्हणजे युरोप अमेरिकेने दिलेलं कां बाळूमामा?
"वर्षभराचे पेड केल्यानंतर मोबाईल वापरावाच लागतो. नाही वापरला तर पैशे वाया गेल्याची खंत."
पण वेळ. त्याचं काय.
रेशन दुकानात ठेवून कार्ड वर दिला असता तर बरं झालं असतं, नाही. पण तो परमेश्वर. त्याला कुणी सांगावं - वेळ अशी येऊ देऊ नको. आपलं थोडंच ऐकतो तो."
कुणाचं ऐकतो? तो तर सर्वव्यापी आहे. सर्वज्ञ आहे.
"कुठलं पुस्तक वाचत आहे साहेब. तुमचं काही खरं नाही."
कां?
"तुकाराम. तरीच."
तुमच्या सुट्टीचं सांगा.
"सांगितलं ना. वाऱ्या दोनवरून एक आणि एकावरून अर्धी-पाव झाली."
अर्धी पाव?
"प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. आज दहा वाजून पंधरा मिनिटांची लोकल चर्चगेट पर्यंत जाणार नाही. दहा तीसची लोकल आज रद्ध करण्यात आलेली आहे. आपल्या गैरसोयी साठी आम्ही दिलगीर आहोत."
मेगा ब्लॉक असेल तरच असं होतं.
"एपिक म्हणजे काय साहेब?"
महाकाव्य किंवा खंडकाव्य
"एपिक फ्युरी म्हणजे?
महाकाव्य क्रोध किंवा महाक्रोध काव्य.
"किंवा खंड क्रोध काव्य, असेच ना. अमेरिकेनं ह्या युद्धाला एपिक फ्यूरी हे नाव दिलं. म्हणजे हा क्रोध एक तर खंडा - खंडात चालेल किंवा एखाद्या महाभारता सारखा. न संपणारा." आपली अत्यावश्यक सेवा पण खंडा -खंडात रुक - रुक के विस्कळीत होईल. व्यवधान के लिये खेद हैं."
बाळूमामाना हे तत्वज्ञान कुठल्या बोधीवृक्षाखाली प्राप्त झालं?
"मी पोस्टमन सारखा आहे. ज्यांना हे तत्वज्ञान प्राप्त होते ते बेस्ट चा प्रवास करतात. ते स्वतःसोबत बोलतात तेव्हा इतरांना आपल्यासोबत बोलल्याचं भास होतो."
हो रे बाळूमामा, आठवलं; इब्राहिम झोलफाकरी अमेरिकेला उद्देशून बोलले: 'तुमची आंतरिक संघर्षाची पातळी स्वतःशीच वाटाघाटी करण्याच्या टप्प्यावर पोचली कां?'
"आपलं काम इंवर्ड -औटवर्ड पोस्टमन सारखं, निरोप घेणे-देणे, सुखरूप पत्त्यावर पोच करणे. तिखट मीठ न लावता बरं कां? नाहीतर आपले पेपर! चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला!"
तुमची सेवा खंडा-खंडात बंद होत आहे कां?
"बंद नाही करायची. एखादी दुसरी बस रस्त्यावर दिसली की पब्लिक कशे शिस्तबद्ध रांगेत उभे राहतात. सगळ्याच सेवा एकाएकी बंद केल्या तर "एपिक फ्यूरी" रस्त्यावर उतरेल की हो साहेब. एकदा कां हे वावटळ रस्त्यावर आलं तर त्याच्या चक्रवातात भली भली सरकारं उलथी - पालथी होतात. असं काही ह्या किंवा कुठल्याही सरकारला परवडण्यासारखं आहे कां?"
मी बाळूमामा कडे पाहत राहिलो. स्वतःला पोस्टमन म्हणणारा हा कंडक्टर एखाद्या कांद्यासारखा असावा. एक परत उघडते तोच दुसरी दिसते.
"मॅनेजर म्हणाले: ' उद्या सुट्टी घ्या.' मी म्हंटल, कां हो साहेब? जेव्हा मागतो तेव्हा देत नाही आणि आता न मागता सुट्टी घ्यायला सांगता. तर म्हणाले: उद्या रामनवमी आहे. घरी राहा. बायको-पोरासोबत उत्सव साजरा करा. रोजची ड्युटी तर आहेच. असे सण दररोज कां येतात? मी म्हटलं, साहेब ही सदबुद्धी रामाने दिली कीं रावणाने? भडकले, म्हणाले: 'रामनवमीच्या दिवशी रावण कुठून आला?' मी म्हटलं, मागची बावीस वर्ष नोकरी करतो. तुम्ही मॅनेजर आहात अशी त्यातली सहा वर्षे. इतक्या वर्षात आठवत नाही तुम्ही सुट्टी घ्या असं सांगितल्याचं. हो, हे आठवतं; सुट्टी घेऊन अयोध्याला जातो असं मी सांगितलं तर तुम्ही काय म्हणाला होता? 'ड्युटी हाच आपला राम आणि दिंडोशीचा डेपो हीच आपली अयोध्या.'"
मग?
"तसे मॅनेजर आपले चांगले आहेत हो. बसायला सांगितलं. चहा मागवला. सिगारेट पिता कां विचारलं. म्हणाले, 'बाळूमामा, रावण कोण हे सगळ्यांना माहित असतं पण उघड बोलता येत नाही. रावण मेल्यानंतर रावण दहन उत्साहात साजरं करता येतं. पण जिंवत असताना कुणाची म्हैस व्यायली आहे? इराण युद्धात आपण सगळेच होरपळून निघत आहोत. डिझल कोट्याकोट्यातुन निघत आहे. तुम्ही सिनियर. तुम्हाला सगळं दिसतं, माहित आहे. कंत्राटी कामगारना सांगता येतं, घरी बसा काही दिवस. तुम्ही सिनियर. इथे डेपोत बसून काय करणार? म्हटलं, रामनवमी साजरी करा.'"
"असं हे रामायण आहे बरं कां साहेब."
अमेरिकेचे 'एपिक फ्यूरी' म्हणजे एक विविध खंडात चक्रवात आणणारं महाक्रोध काव्य आहे हे बाळूमामांनी लक्षात आणून दिलं.
महाकाव्याच्या शेवटी, महाभारताच्या शेवटच्या खंडात युधिष्टीर व त्याचा इमानदार कुत्रा राहतात. कलिंगचे युद्ध संपल्या नंतर, असं म्हणतात, राजा अशोकाला उपरती आली आणि त्याने बौद्ध धर्माचा मार्ग पत्करला.
अमेरिकन शहेनशहाला उपरती येईल कां बाळूमामा?
No comments:
Post a Comment