Sunday, 22 March 2026

आपला तो बाळू आणि शेजारचा काळू

सकाळी सकाळी बाळू मामा घरी आले.  

रविवारी त्यांना सुट्टी असते. 

त्यांना वाटते मलाही सुट्टी असावी.  

किंवा सुट्टी द्यावी. 

“मंडळी घरी नाही वाटते.” 

हे त्यांचे नेहमीचं कर्टन रेजर वाक्य.   

तुम्हाला कसं कळलं? 

जोराजोरात हसले - असे हसले की त्यांचं गोल गुबगुबीत पोट पण सोबत सोबत हसत असावं 

“बहिणीकडे गेल्या वाटतं वाहिनी.” 

तुम्हाला कसं कळलं? 

“ह्या वयात रविवारी बाया नटून थटून कुठं जातील ? बहिणीकडे नाहीतर मावशीकडे.” असं म्हणत त्यांनी तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिलं.  

तुमची मंडळी पण घरी नाही वाटतं? 

“रविवार. पोरं क्रिकेट खेळायला.” 

कॉफी घ्याल? 

“आत्ता जाऊ द्या आपल्याकडे बराच वेळ आहे.” 

मी लॅपटॉप बाजूला ठेवला. बाळूमामा आता कुठला विषय काढतात बुआ? 

“लॅपटॉप मांडीवरच राहू द्या. अशा पोझ मध्ये तुम्ही साक्षात विनायक वाटतात नावाप्रमाणे.”  

मी प्रश्नांची वाट पाहत होतो इतक्यात बाळूमामा म्हणाले: 

“अँडीची कशी वाट लावली म्हणतो त्या केयर ने !” 

अँडी? अँडी फ्लॉवर? आणि हा केयर कोण? 

“तुम्ही पण - एवढे लिहिता वाचता आणि अँडी आणि केयर माहित नाही म्हणता ! अहो, आपल्या मँचेस्टरचा महापौर अँडी, काय बुआ त्याचं आडनाव बुर - बुर असं काहीतरी.

ओह अँडी बुरहाम म्हणता. बाळूमामा आपल्याकडचे महापौर संपले कां. मला वाटलं कमीत कमी तुम्ही खरातावर बोलाल.

“खरातावर सगळेच बोंबलत आहेत. एक मोठी फौज उभी आहे. आपण त्या गटारात कशाला मुतायचं?”

बाळूमामा काय बोलतील हे सांगता येत नाही.  

फार काही शिकला बिकला असं नाहीदहावी पास किंवा फेल असावा. बेस्टची कंडक्टरकी करतो एव्हडं आपल्याला माहितपण सगळ्या जगाचं लपवलेली गुपितं ह्यांच्या त्या पिशवीत साठवलेली.  

“अँडीला इलेक्शन लढवायचं होतं पण केयरनं त्याची वाट लावली.” 

आत्ता थोडा प्रकाश पडला. केयर म्हणजे यूकेचा पंतप्रधान. च्यायला हा बाळूमामा कधी कुठं पोचेल सांगता येत नाही. एकदम साता समुद्र पलीकडे. दाद द्यावी लागेल. 

“आपल्या मार्गात काटा नको म्हणून त्याने त्याची वाट लावली. थोर थोर लोकशाहीच्या देशातील ही लोकशाही बरं कां? कोणीही ह्यावर बोलणार नाही.” 

“आपल्याकडे अडवाणीला घरी बसवलं तर काय बोंब तुमच्या मित्रांची. आपल्या मार्गात अडचण नको म्हणून शिवराज मामाला दिल्लीला आणलं, गडकरींना रस्त्यांवर पाठवलंमोदींच्या नावानं एव्हडे खडे फोडता, ही लोकशाही आहे कां असं बोंबलता, म्हणताही तर निरंकुश हुकूमशाही आहे’. तुमच्या मित्रांना विचारा की साहेब, साहेबांच्या देशात जे चालतं तीच लोकशाही कां?” 

बाळूमामा तुम्हाला हे अँडीचं कुणी सांगितलं? तुम्ही काही फॉरेन मधील वर्तमानपत्रं तर वाचत नाही

“तिकिटे फाडता फाडता हजारों लोकं इकडून तिकडे जात असतात. आपण त्यांचं मन लावून ऐकतो. शाळा कॉलेज मधील पोरं पोरी लय भारी बोलतात हो. कुठलाही विषय घ्या, अशी चिरफाड करतात. तिकिटे फाडता फाडता आपण मन लावून ऐकतो. परवाच्या दिवशी दिंडोशी ते दादर पर्यंत लोकशाही वर ऐकता ऐकता चार पांच तिकिटं फाडायची राहूनच गेली असेल. एक दोन जास्तीची पकडा हवं तर.” 

“गम्मत वाटली एका पोरीची. आपल्याकडच्या लोकशाहीची कशी वाट लागलेली आहे असं दोन चार पोरं घसा फाडून सांगत होतेत्यात ती उभी राहिली म्हणाली लोकशाही म्हणजे नेमकं काय रे बाळा?”

“बाळा? तो पोरगा एकदम बिचकालाच. इंग्लंड मध्ये राजेशाही आहे तरी ती लोकशाही. बेल्जीयम, स्पेन मध्ये राजेशाही आहे तरी ती लोकशाही. लोकशाहीची व्याख्या सांगत बसू नको. व्याख्या त्यांनीच केलीय आणि तेच बाकीच्यांना लेबलं लावणार. आंधळेपणाने तुम्ही त्याची री ओढणार. कुठल्याही देशाला लेबल लावलं मग झालं. इराण मध्ये लोकशाहीची हत्या होत आहे असं ओरडून सांगायचं आणि रेनी गुड आणि अलेक्स प्रेटी ही फक्त दोन उदाहरणं नाही आहेत. पोलीस बंदूकशाहीत अमेरिकेत आता पर्यंत किती निरपराध लोक मारली गेलीत? १९९० पासूनचे आकडे पाहिजे असेल तर मी सांगते. ते जाऊ द्या. डिसेंबर पर्यंत ६८,४४० स्थलांतरित लोकांना जेल मध्ये टाकलं गेलेलं आहे. त्यापैकी ७५% लोकांना बेकायदेशीर रित्या जेल टाकलं गेलेलं आहे.” 

 

“बाकीचं सगळं काही जश्याच तसं आठवत नाही ती काय काय बोलली. तिचं म्हणणं होतं: 

"अमेरिकेतील बंदूकशाहीवर इंग्लंड-युरोप मधील राजकारणी, बुद्धिवादीलोकशाहीचे पाईकाना काही दिसत नाही. स्वतःच्या घरचं दिसत नाही पण तिथे दूरवर बसलेल्या इराण मध्ये काय चाललंय, भारतात काय चाललंय हे दिसतं. व्वा रे इंग्लंड-युरोप! व्याक्खित लोकशाही आणि तिथलं जशाचं तसं घेऊन इथल्या राजकारणावर बोलणारे तुम्ही डावे आणि मध्यमार्गी? लोकशाहचे विश्लेषण करून त्यांची वर्गवारी केलेल्या "V DEM" नुसार ३५ देश निरंकुश हुकूमशाही देश आहेत. त्यामध्ये इराण नाही, बरं कां. गल्फ मधील कुवैत आहे, ओमान आहे, सौदी अरेबिया आहे, यूएई आहे, येमेन आहे. मग इराण वरच हमला कां? इराण इंग्लंड - अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट करत नाही म्हणून? अँग्लो-पर्शिअन ऑइल कंपनीला राष्ट्रीयीकरण करणार म्हणून? फ़ुटबाँल क्लब विकत घेत नाही म्हणून?”    

तुम्हाला एवढं जशाचं तसं कसं आठवतं?

“सुरुवातीला कौतुकानं ऐकत होतो. नंतर वाटलं हा क्षण जाऊ नाही द्यायचा. मोबाईल वर रेकॉर्ड केलं. ऐकायचंय तुम्हाला?” 

मी नकारार्थी मान हलवली.                     

“तिचं ते रूप पाहून राणी लक्ष्मीबाईची आठवण झाली.” 

बाळूमामा, राणी लक्ष्मीबाईला तुम्ही पाहिलं कां?

बाळूमामांनी थोडा श्वास घेतला हे पाहून मी म्हटलं, थोडा ह्या इंग्लंड-युरोप पुराणाला ब्रेक लावू

“काही रूपं पाहायची गरज नसते. ती तशी असतीलच असं इथे (बाळूमामांनी हृदयाकडे बोट दाखवत जोर दिला) फील होणं गरजेजचं.” 

बाळूमामा कॉफी घ्यायची कां? 

“घेऊ की सावकाश. काय घाई आहे. नाही म्हणजे एखादा कंडक्टर बोलतो ते तुमच्या घशाखाली जात नसेल तर काही हरकत नाही.”  

नाही, तसं नाही. म्हटलं तुमचा घसा सुकला असेल तर कॉफी-चहा घेऊ आपल्याकडे वेळ बराच आहे

“असं म्हणता. काही हरकत नाही.”                     

कॉफी करताना बाळूमामांनी सांगितलं, त्या पोरीनं अँडीचं नाव घेतलं आणि ती अशी काही चौफेर लेबर नावाच्या पार्टीवर बरसली मला वाटलं लेबर लोकं इथे असते तर पार गारठून गेले असते. "मी ते नाव लक्षात ठेवलं. मोबाईल वर थोडं गूगल केलं आणि थोडं थोडं ती पोरगी बोलत होती ते इथे (डोक्याकडे हात नेत) घुसू लागलं. पण सगळं काही नीटपणे उमजत नव्हतं. म्हटलं आपल्याकडे पण आहे की साहेबांचा वस्ताद. जाऊ त्याच्याकडे ह्या रविवारी. मंडळी बाहेर जाताना दिसली तसं त्यांना मी विचारलं कुठं मार्केटला? मग कळलं पोरं क्रिकेट खेळायला गेलीय आणि वहिनी साहेब बहिणीकडे जातात

“तसंही पूर्ण रविवार एकटे बसून तुम्ही करणार तरी काय? पुस्तकं-पुस्तकं पण किती वाचायची! आमच्या मंडळींना म्हटलं, साहेबाकडे जाऊन येतो, घरी एकटेच असतील. म्हणाल्या त्यांना डिस्टर्ब करू नका. आत्ता सांगा एकटेपणाला डिस्टर्ब करू नका असं सांगणारी आमची वेडाबाई नाही कां? ते जाऊद्या.”     

बाळुमामाला माझी काळजी आहे हे ऐकून जरा बरं वाटलं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी घरी एकटा असतो तेव्हा थोडं त्यांच्या सोबत बसावं म्हणणारा बाळूमामा त्यांचं काम चालू असेल डिस्टर्ब करू नका म्हणणारी त्यांची सौभाग्यवती. हे खरे आपले तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे सगेसोयरे असावेत कां?   

काही घाई करता बाळूमामा कॉफी पीत होते. माझ्या डोक्यात लोकशाहीचं वारूळ घोंगावत होतं – इराण, इस्राएल, इंग्लंड, युरोप, अमेरीका, भारत….  

मला गप्प बघून बाळूमामा म्हणाले: “साहेब एवढं जीवावर लावून घेऊ नका.

तशी आपल्याकडे एक म्हण आहे ना,  

"आपला तो बाळू आणि शेजारचा काळू"

   

 

No comments:

दोस्त दोस्त ना रहा

" तुमच्या मित्रांची नावे   सांगा ." बाळूमामा,  यादी खूप मोठी आहे . कुठून सुरवात करू ? " मला वाटलंच . आमची ही ...