"तुमच्या मित्रांची नावे सांगा."
बाळूमामा, यादी खूप मोठी आहे. कुठून सुरवात करू?
"मला वाटलंच. आमची ही मला विचारते, तुमचे जवळचे मित्र कोण आहे? मी पण तिला म्हटलं, यादी खूप मोठी आहे. कुठून सुरवात करू? तर म्हणाली, कुठूनही सुरुवात करा. तर साहेब, कुठूनही सुरुवात करा बघू."
शाळेतल्या मित्रांपासून करू?
"मला वाटलंच होतं. मी पण तसंच सांगितलं तर अशी हसली - काय म्हणता ते?"
खोडकर? व्यंगात्मक?
"खोडकर समजले हे व्यंगात्मकचा अर्थ समजून सांगा.?"
कसं सांगू. कठीण आहे.
"सोपं करून सांगा. एखादं उदाहरण देऊन सांगा हवं तर. तुमच्याकडे उदाहरणांना काय तोटा?"
आता असं समजा मी म्हटलं, 'मी मोलभाव करण्यात हुशार आहे'.
बाळूमामा पटकन हसले.
हेच. हे हसणं व्यंगात्मक.
"न बोलता टोला मारणे म्हणजे व्यंगात्मक तर. लय भारी."
माझी अस्वस्थता मोलभाव करण्याच्या पुढं गेलेली
"मग ती व्यंगात्मक हसली असेल नाही?"
व्यंगात्मक हसली? कां. बरं?
"मी पण तिला हेच विचारलं तर म्हणते, एखादं नाव सांगा जो शाळेपासून आतापर्यंत तुमच्या सतत संपर्कात आहे. मी बरंच डोंक खाजवलं पण एक नाव ओठावर येत नव्हतं. तुम्ही सांगा की हो साहेब. तुमचं थोडं वेगळं असेल. तुमचे शाळेपासूनच जिवाभावाचे बरेच मित्र असतील नाही. त्यांना तुमची सतत काळजी आणि तुम्हाला त्यांची."
नावे आली गेली एकही स्थिरावलं नाही.
"नाती फेविकॉलन जोडता आली असती तर कित्ती मजा आली असती नाही?"
असं ती म्हणाली?
"हो. वेळ आणि काळ. आपण कितीही व्हाट्सअप व्हाट्सअप केलं तरी नसलेली नाती अशी जुळतात कां हो?"
तुटलेली थोडं योग्य नाही कां बाळूमामा? शाळामित्र मित्र होते की त्या काळी.
"शाळा सुटली पाटी फुटली ही म्हण आठवते कां, असं आमच्या हिचं म्हणणं. तिला बऱ्याच म्हणी तोंडपाठ आहेत तुमच्या सारख्या."
कॉलेज मध्ये असतानाचे काही मित्र होते. काही भांडण नाही काही धुसपूस नाही. नोकरीत असताना पण काही जिवाभावाचे मित्र झाले.
"मित्र ही संकल्पनाच तशी रोमँटिक आहे ऋषिकेश मुखर्जीच्या पिक्चर सारखी , असं आमची ही म्हणाली."
सुदाम्याचे पोहे आठवले. कृष्ण आणि सुदामा?
"पौराणिक कथा शाळेतल्या पोरांना उदाहरण देण्यासाठी उत्तम असतात. वास्तविक जीवनात कमीच कामाला येतात. एकाद्या श्रीमंत मित्राने आपल्या शाळा मित्राला उद्योग धंदा करण्यासाठी पैशाची मदत केली असं एखादं उदाहरण द्या; हे पण तीच म्हणाली बरं कां साहेब. पण तुम्हाला मी विचारतो, असं आहे कां एखादं उदाहरण?"
आहे की बरीच. मागच्याच महिन्यात मी कुठेतरी वाचलं होतं असं एक उदाहरण.
“वाचलेली सांगू नका. तुमच्या जवळचे तुमच्या आसपासचं उदाहरण सांगा ना."
डोक्यावरचे नसलेले केस चिमटीत पकडून आठवण करायचा प्रयत्न केला. विफल. स्मृतीभंश तर नाही झाला आपला?
म्हटलं, जाऊद्या. आपण मुद्यावर येऊ.
"आमच्याकडचा गॅस संपला. इराणचं युद्ध सुरू झाल्यापासून ही सतत माझ्या मागे लागली होती, एक्स्ट्रा सिलेंडर आणून ठेवा, आणून ठेवा. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मादुरोला कसं चुटकी सारखं एका रात्रीत उचललं. इराणला फार तर एक आठवडा लागेल. ही सांगत होती इराण म्हणजे व्हेनेझुएला काय म्हणतात तो देश नाही. मी तिला डिवचत गेलो. म्हटलं, तू तर एकदम युद्ध या विषयावरची एक्स्पर्ट झालेली दिसते. ती थोडी हिरमुसली, आणि शांत झाली. तिचा मुड ठीक करण्यासाठी मी म्हटलं, अगं आपले इतके मित्र आहेत. संपलाच तर हा अस्सा घेऊन येतो. भाजी चिरून होईपर्यंत सिलेंडर हजर."
आता?
"महिना झाला. दुसरा महिना सुरु झाला. ट्रम्प हैं तो मुमकिन हैं असं वाटणारा मी एकटाच नव्हतो बरं कां."
आणखीन कोणी होते कां आपल्याकडचे. मी थोडं डिवचण्याचा उद्देशाने विचारलं.
"आपल्याकडचे घ्या किंवा तिकडचे घ्या. इराणवर हमला झाला तेव्हा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यापैकी एकानेही ब्र पण नाही काढला. इंग्लंडने नाही नाही म्हणत विमानतळ दिलाच की हो."
स्व-रक्षणासाठी.
"स्व-रक्षण गेलं चुलीत.इंग्लंड वर काही हमले होत नव्हते. कशाचं स्व-रक्षण. बोलण्याची चतुराई. अंग्रेज लोकं लय भारी या कलेत."
मी थोडा बुचकळ्यात पडलो. बेस्टचा कंडक्टर आणि इतकी विचारात स्पष्टता!
"आपल्याकडचे इंग्रजी बोलणारे लोकं पण या कलेत लय भारी असतात बरं कां साहेब."
मी पण बोलतो की इंग्रजी असं म्हणावं इतक्यात बाळूमामा म्हणाले:
"काही अपवाद आहेत बरं कां, तुमच्यासारखे."
असं म्हणत बाळूमामा हलकेच हसले. खोडकर होतं की व्यंगात्मक?
"तर मी काय म्हणत होतो, एखादा मित्र सांगा की राव, गॅस देणारा."
मला काही आठवेना.
"अशावेळी मित्र कामी नाही येत. ब्लॅक मार्केट मध्ये तीन हजाराला एक मिळत आहे. हिम्मत असेल घेऊन या आता. तिथं पण रांगच रांग लागलेली बरं कां. असं ही म्हणाली. मग हळूच म्हणाली, कल्लूला फोन केला तर दोन हजारात घरपोच येतो म्हणतात."
"कल्लू? मी किंचाळलो. त्या फडतूस गँगस्टरला फोन करू? डोकं जाग्यावर आहे कां तुझं? मी पाहतो, बरेच मित्र आहेत की आपले बऱ्या वाईटात सोबत देणारे."
"काल त्याचा फोन आला होता (असं ही म्हणाली). 'अहो वहिनी, आमच्या मित्राला सांगा की झालं गेलं विसरून जा. त्याने इतक्या शिव्या दिल्या पण मी म्हटलं, आपला गावचा आहे शेवटी. त्यानं गँगस्टर आहे असं फक्त आकाशवाणीवर सांगायचं बाकी होतं. अहो टोल कोण घेत नाही. त्याऐवजी सेवा देत असतो आपण, एक खडा सापडणार नाही. पण बाळ्याचं आपलं नेहमीचंच. दूध से धुला हुआ. त्याच्या तूसडेपणावर काही इलाज नाही. तुम्हाला काय सांगायचं. तुम्ही तर दररोज झेलता."
कल्लूचा फोन तुमच्या बायकोला?
"पुढं म्हणाली, तुम्ही म्हणजे वरच्या दादासारखे. थोडं पण वाकत नाही. त्या मॅक्रोनला बघा. मी विचारलं, हा मॅक्रोन कोण? तर म्हणते, काल कोरियाला गेला आणि मित्र ट्रम्प वर अशी आग ओकली की त्यांचं तेलाचं जहाज होर्मूझ वरून फ्रान्स कडे रवाना झालं."
अरे, ट्रम्प एकटा पडला नाही. स्पेन पहिलेच आऊट झाला. इटली पण आऊट. मित्रमंडळातून. पोलंड पण बाहेर पडेल.
"साहेब, ही म्हणाली, मित्र टेबल वरचे . रात्र संपली बात संपली. घ्या नास्ता करा."
गॅस भेटला? काय आश्चर्य.
"म्हणाली, कल्लुदादांनी स्वतः रिक्षात घालून पाठवून दिला. पैशे पण घेतले नाही. फोन केला तर म्हणाले, 'अहो वहिनी, पैशाचं काय लावलंय. आपण मित्र नसलो तरी काय झालं, भावकीतले आहोत. आमच्या बाळूला खमखमीत नास्ता खाऊ घाला'. आज मस्त पैकी मिसळ खाऊन आलोय. तुमच्या साठी आणली असती पण माहित नाही तुम्हाला चालली असती की नाही, कल्लूने पाठविलेल्या गॅस वरची."
दोस्त दोस्त ना रहा.