"चुना कसा लावायचा."
दुपारी जेवण करून थोडं आडवं व्हावं इतक्यात बाळुमामाची एन्ट्री.
"तुम्ही परत आल्याचं कळलं."
त्यात काय नवल.
"नाही म्हणजे दोन तीन आठवड्यात येऊ असं तुम्ही म्हणाले. वाटलं आपले तीन चार रविवार वाया गेले. पण नाही."
मुंबई दर्शन केलं की काय? तसं तिकिटे फाडता फाडता अक्खी मुंबई पालथी घातली असेल. नाशिक शिर्डीला जाऊन आले असाल.
"किती वेळा दर्शन करायचं. देव पण कंटाळायचे आपलं थोबाड वारंवार पाहून."
मग?
"ते जाऊद्या. सांगा चुना कसा लावायचा."
चुना लावण्यासाठी पानाची गरज असते बाळूमामा.
"तेच तेच. कुठलं पान घेऊ."
पाने आठवण्याचा प्रयत्न केला म्हटलं, कपुरी चालेल. तसं काळं पान पण चांगलं असतं डायजेशन साठी. मद्रासी थोडं मसालेदार तर बंगाली तिखट.
"तुम्ही शेवटचं पान खाल्लं त्याला किती दिवस झाले?"
आठवत नाही बरेच दिवस झाले. दोन चार तर नक्की.
"तेच, तेच. तुम्हाला वेळेचं आणि काळाचं भान नाही."
बाळूमामा !
"मी नाही म्हणत..."
असं कोण म्हणतो ?
"ते जाऊद्या. उगाच किटकिट नको."
पान न खाता माझा चेहरा लालबुंद झाला असावा
"साहेब असं वाईट वाटून घेऊ नका. पानाचे प्रकार आता बदलेले आहेत."
ते कसं शक्य आहे.
"ते विचारू नका. मद्रासी कपुरी बंगाली इतिहास जमा झालेत. तात्या विन, तात्या ग्रीन, तात्या इरिन ही चलती नाणी आहेत."
तात्या विन? आपल्या तात्यावरून पानाचे प्रकार सुरु झालेत? आपले तात्या भारीच लोकप्रिय झालेले दिसतात. खिडकीत बसून सुद्धा ग्रेट होता येतं हे तात्यांनी खिडकीत बसून दाखवलं
"तात्या म्हणजे आपले वरच्या खिडकीतील तात्या नव्हेत."
तर?
"अमेरिकेतील तात्या टोपीवाले."
"तात्या टोपे तर स्वातंत्र सेनानी..!
"अहो टोपे आणि टोपी यात फरक आहे. तुमचं मराठी थोडं कच्चं आहे. काना सरळ असतो मात्रा सरळ पण तिरपी असते. वेलांटी टोपी घालते."
व्यवहारात आपण तोकडं आहोत याची कल्पना होती पण व्याकरणात?
"इंग्रजांना टोपी बहाद्दूर कां म्हणायचे?"
ते विशिष्ट प्रकारची टोपी वापरायचे.
"बरोबर. टोपी थोडी तिरकी, आणि वेलांटीदार असली म्हणजे सुबक वाटते. घालायला सोपी आणि ज्याला घातली गेली तो गदगद. त्याला भरून येतं. आनंद असा उफाळून येतो काही सांगू नका. मालकाने सांगितलं हा तुमचा दुश्मन. झालं, तलवार चालली. खिडकीत बसून युद्धाची सगळी मजा लुटता येते. युद्धातील लूट समोरच्या दरवाज्यातून थेट खजिन्यात. मज्जाच मज्जा."
बाळूमामा चुन्यावरून टोपी वर आलेले. दोन आठवड्यात बराच फरक पडलेला जाणवला.
"तर मी काय म्हणत होतो, चुना कसा लावायचा?"
पाने आठवली म्हटलं हे तात्या विन, तात्या ग्रीन, तात्या इरिन काय प्रकार आहे. ही तर कीटकनाशक पाकिटावरची नावे वाटतात.
"अशी वैविध्य पूर्ण पाने खाल्ली तर पोट साफ. पचनक्रिया सुबक होते."
तुम्हाला हे चुन्याचं कसं काय आठवलं?
"तुम्हाला चुना लावता येत नाही साहेब."
तुम्हाला मी काय पानपट्टी वाला वाटलो कां?
"मी असं नाही म्हणालो."
कोण म्हणतो?
"तुमची मुलगी. मागच्या रविवारी तुम्ही आले कां पाहायला आलो तर मामा बसा म्हणाली कॉफी पाजली. थोड्या गप्पा टप्पा झाल्या. म्हणाली, आमचे पप्पा एकदम बावळट आहे. त्यांना चुना पण लावता येत नाही."
बावळट म्हणाली?
"प्रेमानं हो साहेब. तिला तुमचं भलतंच कौतुक. म्हणते आमचे पप्पा टोपी घालत नाही."
एखाद्या कार्यात टोपी घालावी लागते. तिच्या लग्नात बहुतेक घालावी लागेल, म्हणा.
"तेच तेच. मी पण हेच म्हटलं. तर तिने उदाहरणे दिली. खरंच हो साहेब. एकदम फिट्टंफाट आणि सांगतो साहेब खूप खूप कौतुक आहे तिला तुमच्या कामाचं. गणित शिकवतात, चुना कसा लावायचा हे पण गणितच आहे की नाही? म्हणाली, थोडाफार चुना कसा लावायचा हे पण गणित यायला पाहिजे."
पोरगी कौतुक करते हे ऐकून बरं वाटलं.
"तुमच्या तात्यांना बघा. सगळ्यांना टोप्या घालतो, खिडकीत बसून इशारे करतो. खालचे चेंडू फेकतात, बॅटा चालवतात. हा आपला खिडकीत बसून स्टॉक वर खाली आणतो. कित्ती गल्ला जमवला म्हणते मी."
"इंग्रजासारख्या तिरक्या वेलांटी दार टोप्या घातल्या शिवाय कां कुबेराचा धनी होता येतं?"
मी गप्प. पोरगी कौतुक करते? दुर्बलता दाखवते?
"मी जायला निघालो तर म्हणाली, मामा, आमच्या पप्पाना चुना कसा लावायचा हे जरा शिकवा ना? थोडी फार बरकत चालते की."
"साहेब, मी विचार केला. पोरगी म्हणते तर प्रयत्न करायला काही हरकत नाही."
"ही आयडिया मी आमच्या मंडळींना सांगितली. तिचं डोकं भन्नाट या सदरात मोडते की फुटते हे काही सांगता येत नाही, म्हणाली 'एकच कां? असे बरेच असतील की हो बिनडोक.' एक ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन टाका."
"तिच्या आग्रहाखातर हे पत्रक मी तयार केलं."
"तुम्हाला शिकवायचं तर तयारी करावी लागेलच. म्हटलं तात्याच्या गंगेत आपण पण हात धुऊन घेऊ की."
मी पत्रक हातात घेतलं.
"भव्य ऑनलाईन प्रशिक्षण
फक्त १९९ रुपयात घरी बसल्या बसल्या
आत्ताच नोंदणी करा
या क्षेत्रातले दिग्गज मार्गदर्शक
तात्या टोपीवाले खिडकीकर यांच्या कडून शिका आणि लगेच कमाई करा.
पहिल्या हजारांना चुना फ्री मध्ये दिला जाईल.
'चुना कसा लावायचा'
No comments:
Post a Comment