Tuesday, 31 March 2026

माझे माहेर पंढरी

 

बाळूमामा एक पेपर माझ्या समोर ठेऊन म्हणाले

"सही करा."

काय आहे?

"निवेदन."

कशाचं निवेदन? कुणाला?

"'विक्रम आणि वेताळ' मधल्या विक्रमा सारखं प्रश्न काय करत बसता? सही करा आणि मोकळं व्हा. आरामात कॉफी पिऊ की नंतर."

अशी कशी सही करू न वाचता.

"माझ्यावर विश्वास नाही? तुमचा तुमच्यावर पण विश्वास आहे कां कोण जाणे (!)" 

मी पेपर वर लक्ष मारलं. तीन ओळीचा एक परिच्छेद

"आम्ही खाली सही करणारे हे निवेदन करू  इच्छितो' कि बोरिवली ते पनवेल ही हार्बर लायन सेवा त्वरित सुरु करावी. किमान गोरेगांव पर्यंतची हार्बर लायन कांदिवली पर्यंत वाढवावी. इलेक्शन पूर्वी हे झालं नाही तर आमची मतं NOTA ला देऊ." 

खाली पहिलं माझं नाव. माझं नाव पहिलं कां बाळूमामा?

"आमची मंडळी म्हणाली तुमच्या नावात वजन आहे."

काही तरी (आतून जरा सुखावलो तरी वर वर असं म्हणावं लागतं)

"शप्पथ. माझं नाव टाकलेला पेपर तिने टरा - टरा फाडला. म्हणाली, 'बाळूमामा धोंडिबा हे वाचल्यावर तो कारकून टोपली दाखवील की मी म्हणते. नाव कसं शिवनारायण ओमप्रकाश नायक ब्रह्मे सांगलीकर सारखं लांबलचक असावं. नाव वाचता वाचता कारकुनाला काय दीप्तीला पण दम लागेल. दीप्ती की दीपिका? दीप्ती नाही, डिप्टी.  ह्या वयात पण तुम्हाला दीपिका दिसते. नवल आहे. मी म्हटलं, माझे आई, आणि घोळ झाला. असा बवाल झाला काही विचारू नका. मला काही कळेना. 'मी तुम्हाला निरुपा रॉय वाटायला लागली. एक दोन केस पांढरे झाले तर सरळ आईच्या भूमिकेत (!)'."

मेरे पास मां हैं

"एकदम दिवारच उभी झाली की हो आमच्यात. दोन चार आलेले अश्रू पदरानं पुसले. थेट किचन मध्ये. बरं झालं सरकारनं रॉकेल बंद केलं. इराण मुळे गॅस पण संपलेला." 

बाळूमामा? मी जरा दटावण्याच्या सुरात काळी चार पर्यंत गेलो

"नाही म्हणजे हेमा, रेखा, राखी ह्या भवती किती वेळ घुटमळायचं मी म्हणतो."

बाळूमामा, मुद्द्यावर या. पेपर. निवेदन

"पहिली सही तुमचीच पाहिजे बरं कां."

नाव लांबलचक आहे पण वजन 

"ते काही नाही. आमची मंडळी म्हणाली म्हणजे झालं. आपलं काम फक्त टिक टिक करायचं."

पण मी म्हणतो आत्ताच हे निवेदन कशाला. कोण ह्याची नोंद घेणार. तिकडे विश्वयुद्ध पेटण्याच्या मार्गावर आणि इथे आपण हार्बर मार्गावर.

"आमच्या घरी विश्वयुद्ध लावायचं कां तुम्हाला?" 

हे म्हणजे भलतंच की हो बाळूमामा. हार्बर लायन कांदिवली पर्यंत आली नाही तर तुमच्या घरी  विश्वयुद्ध ? हे म्हणजे नराचा नारायण.

"तुम्हाला ते कळणार नाही."

समजून सांगा. मै बहुत समझदार इन्सान हूँ

समझदार इंसान - समझदार इंसान असं म्हणत बाळूमामा सोसायटीच्या वाऱ्यासारखं हसत सुटले.

माझं काय चुकलं

"चुकलं बिकलं काही नाही."

"सकाळी सकाळी काय जोक मारता."

काळी चार पर्यंत जाऊन माझा चेहरा पांढरा पडला असावा. ह्या जगात मी एकटाच अपवाद आहे कां? असा कोण आहे जो स्वतःला समझदार समजत नाही.

"जाऊ द्या हो साहेब. सकाळपासून घोर चिंतेत होतो. विश्वयुद्धाची  ठिणगी पडते की काय असं वाटतं होतं. आता थोडं बरं वाटतं."

प्रश्नचिन्ह कायम 

"त्याचं असं आहे साहेब, ह्यावर पानावर दहा - बारा सह्या झाल्या नाही तर दुपारचं जेवण गॅस वर. पटकन सही करा. आणखी अकरा सह्या घ्यायच्या आहेत."

बाळूमामा, हार्बर लायन गोरेगाव पर्यंत मागची पाच-सहा वर्ष झाली. इतक्या वर्षांत कांदिवली-बोरिवलीचं निवेदन द्यायला पाहिजे होतं. आत्ताच कां

"आम्हाला कांदिवली येऊन किती दिवस झाले?"

झाले असेल की एक-दोन महिने

"करेक्ट. गोरेगांवला होतो तोपर्यंत काही अडचण नव्हती. सरळ गोरेगाववरुन निघालो की पनवेल. सकाळी हलका नाश्ता करून निघायचं ते थेट रात्रीचं जेवण करूनच माघारी निघायचं."   

तुम्हाला एवढं काय काम असतं म्हणतो मी पनवेलला.

"माझं माहेर पंढरी."

आहे भीवरेच्या तीरी. मी वाक्य पूर्ण केलं.

"बरोबर." 

काय बरोबर. तुम्ही साताऱ्याचे

बाप्या  माणसाला माहेर थोडंच असतं

वहिनीचं म्हणता? त्यातर खेड कडच्या ना?

"खेड्याची खेडी रिकामी होऊन पुण्या मुंबईला स्थिरावली. पनवेल हे एक खेडंच आहे आपल्याकडचं." 

निवेदन दिल्यानं लगेच हार्बर लायन कांदिवली पर्यंत थोडीच येणार आहे

"ते काय आपणास ठावू नाही म्हणता. एकवेळ महिन्याचा पगार हाती कमी ठेवला तरी चालतो. पण माहेर वर प्रेम नाही असं जाणवलं तर आपली काही खैर नसते साहेब."

प्रेम दाखवणे हे पटत नाही, बाळूमामा

बाळूमामा परत खो-खो हसत सुटले

"दिखावा करावाच लागतो साहेब.

"प्रेम नाही केलं तरी चालेल. दिखावा लागतोच. गळा काडून रडणाऱ्यानी जिवंत असताना ढुंकून सुद्धा पाहिलं नसेल."

"थोडं मुलाबाळांवर कमी दाखवलं तरी चालेल. माहेर? नाही दाखवलं तर चहात कधी साखर नसते तर भाजीत कधी मीठ."

मी सही केली आणि कागद बाळुमामाच्या हाती दिला

कांदिवली पर्यंत हार्बर लायन आली नाही तरी चालेल पण निवेदनावर सही करायला पाहिजे हे बाळुमामाचं घरगुती तत्वज्ञान घरोघरी पोचलं पाहिजे

विश्वयुद्ध कुणाला पाहिजे?      

माझे माहेर पंढरी    
मन उल्हासी                    
पूर्व-तीरी   


Sunday, 29 March 2026

शांतता, युद्ध चालू आहे

 

​"युद्धाला कारणीभूत कोण आहे ते सांगा."

सकाळी सकाळी बाळूमामा दत्त म्हणून घरी हजर. नमस्कार चमत्कार नाही, हाय हॅलो नाही. सरळ सरळ प्रश्न.

हे बाळूमामाचं वेगळं स्वरूप

ट्रम्पआणखी कोण? सपोर्ट कास्ट मध्ये पाहिजे असल्यास प्रथम क्रमांकावर बीबी टाकू. एक्सट्रा मध्ये हेगशेठ बरीच तत्सम नावे जोडता येतील

"तुम्ही अंशतः मार्ग जवळ जवळ बरोबर पकडलेला आहे. पण पूर्ण सत्य ह्या चष्म्यातून दिसणं तितकी सोपं नाही."

तुम्ही जी बी वाचत तर नाही आहे ना?

"हा जी कोण? आणि त्याची डिग्री सांगण्याचं औचित्य काय?"

जी कुलकर्णी

साहेब कोणत्या वेळी कुलकर्णी आणि कोणत्या वेळी जोशी. तुमचं म्हणजे भलतंच. प्रसंग युद्धाचा आहे. प्रश्न युद्धाचा आहे. घाव कसा ऐरणीवर टाकायला पाहिजे की नाही? तुमची म्हणजे किसमणी जास्त."

किस्मणी  हा कोंकणी शब्द. तुम्हाला कुठून सापडला?

ते जाऊद्या. तुम्ही म्हणजे त्या शेळके तात्या सारखे. जिलेब्या काढत बसता. मूळ मुद्यांवर येईपर्यंत अमेरिका मंगळावरून शुक्रा वर जाईल

घाव ऐरणीवर बसला बरं कां बाळूमामा.

"युद्धाचं कारण सांगा. असं करा चार-पाच कारणं सांगा. ऑप्शन नंबर एक: जसं तुम्ही म्हणाला ट्रम्प. पण तो करता आहे कारण नाही."

तूच करता तूच करविता शरण तुला भगंवता

"जोक मारू नका." 

भक्तीगीत आहे बाळूमामा. तुम्ही ऐकलं असेलच 

"परत तेच. मार्गावरून भटकूं नका. सगळं काही भगवंताच्या माथ्यावर टाकलं म्हणजे आपण मोकळे. हा हात झटकून टाकण्याचा प्रकार आहे. कोणी लिहिलं हे?"

बाळुमामाची उत्सुकता जागरूक झाली असावी 

पी. सावळाराम. संगीत वसंत प्रभू

"तरीच."

काय

"काही नाही. पी आणि प्रभू. जोडी छान जमली." 

काय बोलावं हे कळल्यामुळं तोंड आवासून बाळूमामा कडे बघतच राहिलो

"भक्तीगीत-संगीत ह्याचा हा वेळ नाही साहेब. सकाळी सकाळी काय कोणी भक्तीगीत आळवत असतो. रविवार आहे हे ठीक आहे तरीही.."

मला काय बोलावं हे सुचेना

"ऑप्शन वर या. कारणं सांगा." 

युरोप अमेरीकेचे पेपर सांगतात ती कारणं देऊ, आपल्याकडचे पेपर सांगतात तसं त्यांची री ओढून सांगू, की....?

"सगळं ऐकू. शेवटी तुमचं मत ऐकू." 

इराण अणुबॉम्ब करण्याच्या मार्गावर होता आणि त्याला रोखण्यासाठी बीबी आणि ट्रम्प दोघांनी मिळून हे कारस्थान उधळून लावून जगावरचं संकट टाळलं

"हे चावून चावून चोथा झालेलं. नुकतंच बारसं झालेलं पोरगं पण कसं फिदीफिदी हसेल म्हणतो."

मौला मौलवींच्या अत्याचारी शासनापासून इराणच्या जनतेची मुक्ती करण्यासाठी

"हे पाश्चिमात्य सरकारी मतं मांडणारे पेपर बोलत असतीलनाही?  हा काही पाश्चिमात्य जनतेचा आवाज नाही आहे."

असं कसं म्हणू शकता तुम्ही?

"No Kings म्हणत जनता एकाच वेळी अमेरिकी पन्नास राज्यात व युरोप मधल्या प्रमुख शहरामध्ये रस्त्यावर उतरली नसती. पेपर राज्यकर्त्यांची मर्जी सांभाळत सांभाळत लिहितो. पण जनता? वाटते तशी नेभळट नसते जनता. पेपर नव्हते तेव्हाही उठाव होत होते. क्रांत्या होत होत्या. स्वाभिमान शिवाजीच्या काळातही होता आणि आताही शिल्लक आहे. बापाच्या विरोधात बंड तेव्हाही होत होतं आणि आजही आहे. गुलामी तेव्हाही मान्य नव्हती आणि आजही मान्य नाही."
 
बाळुमामाच्या चेहऱ्यावर, डोळ्यात शिवाजी महाराजा विषयीचा सार्थ अभिमान ठळक दिसत होता. डोळ्यात अंगार.    

"ते जाऊद्या, तुमचं मत सांगा. माझा अजून नाश्ता व्हायचा आहे."

पोहे टाकू? छान मुगाच्या डाळीचा हलवा बनवतो हवा तर

"साहेब, आज रविवार आहे. बाहेर पडा, मच्छी मार्केट मध्ये काय गर्दी!"

नाश्त्याला पण मच्छी

"नाश्त्याला नाही हो. संध्याकाळची सोय सकाळीच करावी लागते. मिसळ पाव चालेल की नाश्त्याला. कोल्हापूरचा असेल तर काही सांगू नका. नाशिकचा पण चालेल."

मी वरवरून शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि कोल्हापुरी मिसळ पाव अंदरून घाम फोडत होता.

"चला, आपण हा विषय मोकळा करू. मी तुम्हाला घेऊन जातो 'यलाप्पा नाश्ता सेन्टर' ला. एकदा खाऊन पहा, जिभेवरून चव निघणार नाही."

खायला काही हरकत नाही पण मायकलचा अनुभव आठवला. लक्ष्मीपुरीत मिसळ पाव खाल्यानंतर तो म्हणाला:" I know why you Indians use water; that bloody tissue paper will catch fire". 

"साहेब, कुठं हरवलेअसं शांत शांत बसून नाही चालणार. युद्ध गेट वर पोचलेलं आहे."

हं. तर काय म्हणत होतो, ऑप्शन, युद्धाची कारणं, युरोप अमेरिका आपले पेपर

"गेले चुलीत. आपल्याकडे वेळ नाही हे पेपरचं गुऱ्हाळ सांगत बसायला, ऐकत बसायला. मिसळ पाव सुटता कामा नये हे लक्षात घ्या."

"चला, तुमचं मत सांगा."   

मिसळ पाव डोक्यातून जाईना. विचार करून अशी मिरची झोंबते खाल्लं तर काय होईल.

"ठीक आहे. आज तुमचा मूड दिसत नाही गंभीर विषयावर चर्चा करायचा. रविवार आहे समजू शकतो आपण." 

"मी सांगतो. आता नीट खुर्चीला घट्ट पकडून बसा. नाहीतर मिसाईल सारखे हवेत उडून जाल."

"ह्या युद्धाला कारणीभूत फक्त एकच संस्था-एकच देश. नोबल शांती पुरस्कार समिती आणि नॉर्वे."

हे म्हणजे 'नाक खंय आणि आदोळी खंय' ह्या कोंकणी म्हणी सारखं. त्याचा काय संबंध.

"आता हे सांगा साहेबतुमच्या ट्रम्पला काय पाहिजे होतं. नोबल शांती पुरस्कार. भारत-पाकिस्तान पकडून कमीत कमी आठ युद्ध त्यांनी थांबवली. ह्याची त्या समितीने नोंदच घेतली नाही हो."

युद्धाची खुमखुमी असणाऱ्याला कां देतात शांती पुरस्कार. हे म्हणजे आपल्याकडे एखाद्या इजारदाराला, संस्थानिकाला गांधी पुरस्कार देण्या सारखं नाही कां. एखाद्या मठाधीशाला लोहिया पुरस्कार दिल्याचं आठवतं कां

"गांधी बाबांचं नाव ऐकलेलं आहे. हा लोहिया कोण? तो कारखानदार तर नव्हे?"

सरकारी आणि असरकारी गांधी, मठाधीश गांधी अशी बिरुदं लावल्यानंतर कोण संस्थानिक किंवा सरकारी गांधी त्यांची आठवण काढेल हो. त्यांचं जाऊद्या. पण हे तुम्ही भलतंच काही सांगता. नोबल शांती पुरस्कार असा काही चणे फुटाणे वाटण्यासारखा थोडाच आहे. आतापर्यंत एक नाव…..

माझं वाक्य पूर्ण होण्याची बाळूमामांनी वाट पहिली नाही. पटकन म्हणाले,

"हेनरी किसिंजर. गूगल सर्च करा. व्हिएतनाम युद्ध ते नोबेल शांती पुरस्कार हा सगळं प्रवास. तुम्ही एवढं लिहिता वाचता, पार बेकार. लिहिण्याची भीती वाटत असेल तर लिहू नकामूळ मुद्याचं वाचा."

वाचलं नाही कसं म्हणणार? मारिया कोरीना माशादो विषयी पण वाचलं आणि तिने हा शांती पुरस्कार कसा ट्रम्पच्या गळ्यात टाकला, ही मनाला अशांत करणारी बातमी पण वाचली

"साहेब, एखादा शांती पुरस्कार दिला तर काय जातं म्हणतो? ह्या वर्षीचा जिला दिला तीन तर तो ट्रम्पला भेट केलाच ना. आपल्याकडे असं झालं असतं  तर काय छी-थू केली असती युरोप अमेरिकेने.'

"मी म्हणतो, पुढच्या वर्षी किंवा त्याही पुढच्या वर्षी दहा बारा युद्ध थांबवल्यानंतर कधी तरी देणारच ना. युद्ध सुरु करण्या आधीच दिला असता तर ट्रम्प कशाला ह्या फंदात पडले असते."

 शांतता, युद्ध चालू आहे    

 

दोस्त दोस्त ना रहा

" तुमच्या मित्रांची नावे   सांगा ." बाळूमामा,  यादी खूप मोठी आहे . कुठून सुरवात करू ? " मला वाटलंच . आमची ही ...