"युद्धाला कारणीभूत कोण आहे ते सांगा."
सकाळी सकाळी बाळूमामा दत्त म्हणून घरी हजर. नमस्कार चमत्कार नाही, हाय हॅलो नाही. सरळ सरळ प्रश्न.
हे बाळूमामाचं वेगळं स्वरूप.
ट्रम्प, आणखी कोण? सपोर्ट कास्ट मध्ये पाहिजे असल्यास प्रथम क्रमांकावर बीबी टाकू. एक्सट्रा मध्ये हेगशेठ व बरीच तत्सम नावे जोडता येतील.
"तुम्ही अंशतः मार्ग जवळ जवळ बरोबर पकडलेला आहे. पण पूर्ण सत्य ह्या चष्म्यातून दिसणं तितकी सोपं नाही."
तुम्ही जी ए बी ए वाचत तर नाही आहे ना?
"हा जी ए कोण? आणि त्याची डिग्री सांगण्याचं औचित्य काय?"
जी ए कुलकर्णी.
साहेब कोणत्या वेळी कुलकर्णी आणि कोणत्या वेळी जोशी. तुमचं म्हणजे भलतंच. प्रसंग युद्धाचा आहे. प्रश्न युद्धाचा आहे. घाव कसा ऐरणीवर टाकायला पाहिजे की नाही? तुमची म्हणजे किसमणी जास्त."
किस्मणी हा कोंकणी शब्द. तुम्हाला कुठून सापडला?
ते जाऊद्या. तुम्ही म्हणजे त्या शेळके तात्या सारखे. जिलेब्या काढत बसता. मूळ मुद्यांवर येईपर्यंत अमेरिका मंगळावरून शुक्रा वर जाईल.
घाव ऐरणीवर बसला बरं कां बाळूमामा.
"युद्धाचं कारण सांगा. असं करा चार-पाच कारणं सांगा. ऑप्शन नंबर एक: जसं तुम्ही म्हणाला ट्रम्प. पण तो करता आहे कारण नाही."
तूच करता तूच करविता शरण तुला भगंवता.
"जोक मारू नका."
भक्तीगीत आहे बाळूमामा. तुम्ही ऐकलं असेलच
"परत तेच. मार्गावरून भटकूं नका. सगळं काही भगवंताच्या माथ्यावर टाकलं म्हणजे आपण मोकळे. हा हात झटकून टाकण्याचा प्रकार आहे. कोणी लिहिलं हे?"
बाळुमामाची उत्सुकता जागरूक झाली असावी
पी. सावळाराम. संगीत वसंत प्रभू.
"तरीच."
काय?
"काही नाही. पी आणि प्रभू. जोडी छान जमली."
काय बोलावं हे न कळल्यामुळं तोंड आवासून बाळूमामा कडे बघतच राहिलो.
"भक्तीगीत-संगीत ह्याचा हा वेळ नाही साहेब. सकाळी सकाळी काय कोणी भक्तीगीत आळवत असतो. रविवार आहे हे ठीक आहे तरीही.."
मला काय बोलावं हे सुचेना.
"ऑप्शन वर या. कारणं सांगा."
युरोप अमेरीकेचे पेपर सांगतात ती कारणं देऊ, आपल्याकडचे पेपर सांगतात तसं त्यांची री ओढून सांगू, की....?
"सगळं ऐकू. शेवटी तुमचं मत ऐकू."
इराण अणुबॉम्ब करण्याच्या मार्गावर होता आणि त्याला रोखण्यासाठी बीबी आणि ट्रम्प दोघांनी मिळून हे कारस्थान उधळून लावून जगावरचं संकट टाळलं.
"हे चावून चावून चोथा झालेलं. नुकतंच बारसं झालेलं पोरगं पण कसं फिदीफिदी हसेल म्हणतो."
मौला मौलवींच्या अत्याचारी शासनापासून इराणच्या जनतेची मुक्ती करण्यासाठी.
"हे पाश्चिमात्य सरकारी मतं मांडणारे पेपर बोलत असतील, नाही? हा काही पाश्चिमात्य जनतेचा आवाज नाही आहे."
असं कसं म्हणू शकता तुम्ही?
"ते जाऊद्या, तुमचं मत सांगा. माझा अजून नाश्ता व्हायचा आहे."
पोहे टाकू? छान मुगाच्या डाळीचा हलवा बनवतो हवा तर.
"साहेब, आज रविवार आहे. बाहेर पडा, मच्छी मार्केट मध्ये काय गर्दी!"
नाश्त्याला पण मच्छी?
"नाश्त्याला नाही हो. संध्याकाळची सोय सकाळीच करावी लागते. मिसळ पाव चालेल की नाश्त्याला. कोल्हापूरचा असेल तर काही सांगू नका. नाशिकचा पण चालेल."
मी वरवरून शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि कोल्हापुरी मिसळ पाव अंदरून घाम फोडत होता.
"चला, आपण हा विषय मोकळा करू. मी तुम्हाला घेऊन जातो 'यलाप्पा नाश्ता सेन्टर' ला. एकदा खाऊन पहा, जिभेवरून चव निघणार नाही."
खायला काही हरकत नाही पण मायकलचा अनुभव आठवला. लक्ष्मीपुरीत मिसळ पाव खाल्यानंतर तो म्हणाला:" I know why you Indians use water; that bloody tissue paper will catch fire".
"साहेब, कुठं हरवले? असं शांत शांत बसून नाही चालणार. युद्ध गेट वर पोचलेलं आहे."
हं. तर काय म्हणत होतो, ऑप्शन, युद्धाची कारणं, युरोप अमेरिका आपले पेपर.
"गेले चुलीत. आपल्याकडे वेळ नाही हे पेपरचं गुऱ्हाळ सांगत बसायला, ऐकत बसायला. मिसळ पाव सुटता कामा नये हे लक्षात घ्या."
"चला, तुमचं मत सांगा."
मिसळ पाव डोक्यातून जाईना. विचार करून अशी मिरची झोंबते खाल्लं तर काय होईल.
"ठीक आहे. आज तुमचा मूड दिसत नाही गंभीर विषयावर चर्चा करायचा. रविवार आहे समजू शकतो आपण."
"मी सांगतो. आता नीट खुर्चीला घट्ट पकडून बसा. नाहीतर मिसाईल सारखे हवेत उडून जाल."
"ह्या युद्धाला कारणीभूत फक्त एकच संस्था-एकच देश. नोबल शांती पुरस्कार समिती आणि नॉर्वे."
हे म्हणजे 'नाक खंय आणि आदोळी खंय' ह्या कोंकणी म्हणी सारखं. त्याचा काय संबंध.
"आता हे सांगा साहेब. तुमच्या ट्रम्पला काय पाहिजे होतं. नोबल शांती पुरस्कार. भारत-पाकिस्तान पकडून कमीत कमी आठ युद्ध त्यांनी थांबवली. ह्याची त्या समितीने नोंदच घेतली नाही हो."
युद्धाची खुमखुमी असणाऱ्याला कां देतात शांती पुरस्कार. हे म्हणजे आपल्याकडे एखाद्या इजारदाराला, संस्थानिकाला गांधी पुरस्कार देण्या सारखं नाही कां. एखाद्या मठाधीशाला लोहिया पुरस्कार दिल्याचं आठवतं कां?
"गांधी बाबांचं नाव ऐकलेलं आहे. हा लोहिया कोण? तो कारखानदार तर नव्हे?"
सरकारी आणि असरकारी गांधी, मठाधीश गांधी अशी बिरुदं लावल्यानंतर कोण संस्थानिक किंवा सरकारी गांधी त्यांची आठवण काढेल हो. त्यांचं जाऊद्या. पण हे तुम्ही भलतंच काही सांगता. नोबल शांती पुरस्कार असा काही चणे फुटाणे वाटण्यासारखा थोडाच आहे. आतापर्यंत एक नाव…..
माझं वाक्य पूर्ण होण्याची बाळूमामांनी वाट पहिली नाही. पटकन म्हणाले,
"हेनरी किसिंजर. गूगल सर्च करा. व्हिएतनाम युद्ध ते नोबेल शांती पुरस्कार हा सगळं प्रवास. तुम्ही एवढं लिहिता वाचता, पार बेकार. लिहिण्याची भीती वाटत असेल तर लिहू नका, मूळ मुद्याचं वाचा."
वाचलं नाही कसं म्हणणार? मारिया कोरीना माशादो विषयी पण वाचलं आणि तिने हा शांती पुरस्कार कसा ट्रम्पच्या गळ्यात टाकला, ही मनाला अशांत करणारी बातमी पण वाचली.
"साहेब, एखादा शांती पुरस्कार दिला तर काय जातं म्हणतो? ह्या वर्षीचा जिला दिला तीन तर तो ट्रम्पला भेट केलाच ना. आपल्याकडे असं झालं असतं तर काय छी-थू केली असती युरोप अमेरिकेने.'
"मी म्हणतो, पुढच्या वर्षी किंवा त्याही पुढच्या वर्षी दहा बारा युद्ध थांबवल्यानंतर कधी तरी देणारच ना. युद्ध सुरु करण्या आधीच दिला असता तर ट्रम्प कशाला ह्या फंदात पडले असते."
शांतता, युद्ध चालू आहे
No comments:
Post a Comment