Saturday, 28 March 2026

नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा

नावात काय आहे असे म्हणतात. 

नावात बरंच काही दडलेलं असतं असे काही जणांना वाटतं. 

ही इंग्रजी म्हण घ्या: "Blow one's own trumpet". म्हणजे स्वतःचे गुणगाण करत राहणे असा साधा व सरळ अर्थ. कोंकणी मध्ये ह्या अर्थी एक म्हण आहे: "माकड खंय आपल्याच गानिक तोकयता”. ह्या अर्थी मराठीत पण एक म्हण तयार करता येते: “आपलीच लाल त्याचा काय बोल-बाल (Copyright protected)! 

Blow one's own trumpet ही ट्रम्पला तंतोतंत लागू पडणारी म्हण आहे असे काही मित्र सांगतात. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तर आता त्यांचे MAGA अनुयायी व रिपब्लिकन पार्टीचे डेलिगेट्स पण अप्रत्यक्षरीत्या असं सांगायला लागलेत असं म्हणायला काही हरकत नसावी. सध्या टेक्सास इथे पुराणमतवादी (Conservative) पोलिटिकल ऍक्शन कॉन्फेरंस चालू आहे. एकोणीशे चौऱ्ह्यातर पासून अशी कॉन्फरेन्स  दरवर्षी घेतली जाते म्हणे. विविध विषयांवर चर्चा सत्र घेतली जातात. "Breaking Stuff and Killing Bad Guys: The Case for Western Military Dominance" ह्या सत्रात एरीक प्रिन्स बोलताना काही तथ्यामक गोष्ठी सांगून गेला. प्रथम आपण हा एरीक प्रिन्स हा कोण आहे हे पाहूया. 

एरीक प्रिन्स हा कोणी सामाजिक कार्यकर्ता नाही आहे. तो ब्लॅकवॉटर नामक एका मिलिटरी कंत्राटी कंपनीचा संस्थापक आहे. तो म्हणाला (स्वैर भाषांतर, चूक-भूल द्यावी घ्यावी): "आपल्यासमोर एक कठीण आव्हान आहे. इराणचा असा एखादा स्वातंत्र्य दिवस नाही कारण अलेक्सान्डर द ग्रेटच्या काळापासून त्यांच्यावर कुणीही विजय मिळवलेला नाही.” युद्धाच्या भविष्याबद्धल एक भयावक चित्र रंगवताना, आणि लढाई 'जलद व शांततापूर्ण रीतीने संपुष्ठात येईल' हा अमेरिकी प्रशासनाचा आशावाद (दावा) फेटाळून लावताना तो पुढं सांगतो, "मी सहमत आहे की अमेरिका जिंकेल (असं म्हणवाच लागेल ना!!!). पण जे लोक जयजयकार - जल्लोष करत आहेत त्यांनीही यात सक्रियपणे सहभागी व्हायला हवं ("I agree, USA all the way, but all the people who are cheering, make sure you put skin in the game").  

रस मौल्ड हा ‘ए जे बेल’ कंपनी चा इन्व्हेस्टमेंट डायरेक्टर. तो म्हणतो, "संशयाचा एक अंश भिरभिरताना दिसत आहे. किंचा आपण असू म्हणू, कडा -कडांनी निराशावाद सरकताना दिसत आहे"

द बान्सन ग्रुप​चा ब्रायन सिझटेल  म्हणतो: "जसे म्हटले जाते, युद्धाचा पहिला बळी हे "सत्य" असते. मला असा संशय आहे की, "फलदायी चर्चा", किंवा ह्याच्या उलट परिस्थिती, ह्या विषयी जी काही परस्पर विधाने किंवा शाब्दिक चकमकी सुरु आहेत त्यातील बराचसा भाग तेलाच्या किमतीत फेरफार करण्यावरच केंद्रित झालेला आहे.

काही वर्तमान पात्र नुसार ट्रम्पच्या Truth Social ह्या प्लॅटफॉर्म वर (प्रवास सोडल्यापासून प्लॅटफॉर्म वर जाण्याचे आपले राहून गेलेले आहे) त्यांनी असं म्हटलं (तुम्ही ही वाचलं असेलच): “इराणचे अधिकारी जाहीरपणे 'प्रस्तावाचा विचार करत आहोत' असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ते वाटाघाटी करण्यासाठी 'काकुळतीला' आले आहेत ('they are begging for negotiations) आणि त्यांच्या मते, त्यांना "कोणताही करार करण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे."

ट्रम्प हे नाव लहान-मोठ्यांच्या जिभेवर आहे. त्यांचे अनुयायी "ट्रम्प हैं तो मुमकिन हैं" असे अजूनही म्हणताना दिसतात. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प कार्ड आहे की नाही हे नोव्हेंबरच्या मिड-टर्म इलेक्शन नंतर कळेल     

नावे सिम्बॉलिक (प्रतीकात्मक) असतात. काही निव्वळ फायदा-तोटा पाहून ठेवली जातात. पक्षांच्या नावामध्ये "समाजवादी" हा शब्द घ्या. "जनता" हा शब्द पण बराच प्रचलित आहे. "नवनिर्माण' हा असाच एक शब्द ज्याच्या प्रेमात राजकीय पक्ष ते सामाजिक संस्था (NGO म्हणणे जास्त सोयीचं होईल, नाही?) पडलेल्या दिसतात (मी पण ऐशी च्या दशकात अशाच एका नवनिर्माण संघटनेचा कार्यकर्ता होतो, बरं कां?). "शांती" शब्द ज्या राजकीय पक्षाच्या किंवा संस्थेच्या नावामध्ये असेल तो पक्ष किंवा संस्था शांती साठी कार्य करेल असं नाही. किंवा त्या पक्षात किंवा संस्था मध्ये अंतर्गत धुसफूस - अशांती नसेल असं म्हणता येणार नाही. किंबहुना त्यांना शांती प्रिय असावीच असे नाही. 

उथळ असलेल्या व्यक्तीचे नाव “प्रशांत” ठेवताना त्याच्या आई वडलांनी काय अपेक्षा ठेवली असेल? पण आई वडील नाव ठेवताना असा काही विचार करत नसावे. त्यावेळी चलनात असलेल्या व्यक्ती (म्हणजे हिरो केंद्रित) च्या नावाचं वलय असतं बहुतेक. जितेंद्र, राजेश, रेखा, डिम्पल, अशी बरीच लांबलचक यादी देता येते. "मैने प्यार किया” च्या यशानंतर आपल्याकडे "भाग्यश्री" नावाचे एक झंझावात आल्याचे दिसते, किती जणांच्या भाग्यात निखळ प्रेम आले हा वेगळा मुद्धा.    

नावात बरंच काही असतं, नाही?

पण हे काही अपवाद असू शकतात. नाहीतर आपल्याकडची म्हण "नाव सोनुबाई आणि हाती कथळाचा वाळा" रुळली नसती. 

म्हणून, काही अपवाद सोडले तर, नावावर जाऊ नये. नाहीतर,           

लक्ष्मी नावाची बाई मनरेगाच्या रोजंदारी वर दिसली नसती  आणि शिवाजी नावाचा व्यक्ती इजारदाराकडे सालगडी म्हणून कामाला गेला नसता.    

नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा 

  

 

No comments:

दोस्त दोस्त ना रहा

" तुमच्या मित्रांची नावे   सांगा ." बाळूमामा,  यादी खूप मोठी आहे . कुठून सुरवात करू ? " मला वाटलंच . आमची ही ...