"तुम्हाला अजिबात अक्कल नाही".
बाळूमामा सकाळी सकाळी माझी अक्कल काढता?
"तुम्ही स्वतःला एवढे हुश्शार म्हणवता, व्यवहार ज्ञान काडीचं नाही."
बाळूमामा सकाळी सकाळी ...
"गाढव आहात."
आता हे जास्तच झालं. सकाळी पारी आपला पारा तसा चढत नसतो. काळी एक नंतर मी दीर्घ श्वास घेतो. डोळे मिटावे व अनुलोम विलोम करावा कां?
"असं मी म्हणत नाही हो साहेब तुम्हाला. आमची ही म्हणते."
तिचं काय वाकडं केलं म्हणून आम्हास हे विशेषण?
"तुम्हाला नाही हो साहेब. तुम्हाला तर ती ट्रम्पच्या लेवलचा हुशार माणूस मानते आमची ही."
थोडं मोकळं वाटलं. तुम्हाला म्हणाली कां? मी हसत हसत विचारलं.
"मला म्हटलं तर चालतं, नाही साहेब? तुम्हाला ट्रम्प लेवलचा हुशार म्हटलं तर तुम्ही खूष. एकदम कशे हसरे-मुखरे झाले बघा."
कुठं ट्रम्प आणि कुठं मी. आवळा भोपळ्याची तुलना होऊ शकते कां?
"आवळा कोण आणि भोपळा कोण?"
ते जाऊद्या. तुमच्या अक्कले विषयी सांगा. अशी कशी एकदम अक्कल काढली.
"एक सोफा आणला. दुसऱ्या हाती."
दुसऱ्या हाती?
"सेकंड हॅन्ड साहेब. तसा नवीनच. एकदम कोरा करकरीत. घेतला आणि त्याची बदली झाली. त्रासदायक विक्री."
त्रासदायक विक्री. हा काय प्रकार आहे.
"डिस्ट्रेस सेल. मराठीत सांगितलं तर समजत नाही. काय दिवस आलेत आपल्या मातृभाषेला."
मला हसू आवरेना.
"साहेब, कुणी आपल्याला गाढव म्हणू द्या पण मातृभाषेवर आपलं प्रेम. त्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिम्मत होणार नाही."
वादच नाही. दुसऱ्या हाती सोफ्याच्या त्रासदायक विक्रीचं पुराण पुढं चालू द्या.
"त्याचं असं झालं साहेब, शेळके तात्या म्हणाले शेजारच्या बिल्डिंग मध्ये गर्दी दिसते. चला काय भानगड आहे पाहू या. शेळके तात्या म्हणजे एकदम ट्रम्प सारखा माणूस. आपल्या घरात अजिबात लक्ष नसतं पण खिडकीत बसून 'मार ए लागो' असतो."
मार ए लागो? नवीन वाक्यप्रचार दिसतो.
"आजकाल तुम्ही लिहिता जास्त आणि वाचन शून्य. मार ए लागो हे कुणाच्या घराचं नाव आहे?"
हो. सामाजिक सत्याची एक तिरीप धडकन खिडकीतून आत आली.
पुढं?
"शेळके तात्यांना म्हटलं, अहो तात्या, आपण आपल्या घरचं बघू की. आपल्याला रात्रीच्या जेवणाची चिंता आणि तुम्ही शेजारच्या बिल्डिंगची चिंता करता. आपण म्हणजे ट्रम्प किंवा बीबी आहोत कां? इथे काय चाललंय तिथे काय फटाके फुटले हे बघणं आपलं काम नाही तात्या. पण तात्या तो तात्या. कुणाचं ऐकतो कां? बखोटीला धरून ओढत नेलं मला. म्हणाले, मी एकटाच कशी मजा घेऊ?"
मग?
"तिथं गेलो तर ही गर्दी. आपल्या शेजारचे अण्णा पण होते. काय असं खुणेनं विचारलं तर म्हणाले, 'सेकंड हॅन्ड फर्निचर'. मी विचारलं, तुम्ही घेता? घेऊन काय करणार. आहे त्यावरच झोपणं होत नाही. सहज विरंगुळा म्हणून आलो."
विंडो शॉपिंग. वेळ बराच असेल अण्णांना.
"वेळच आहे त्यांच्याकडे आणखी काही नाही. खालच्या बाकड्यावरचे प्रथम क्रमांकाचे पाईक. तिथून बसल्या बसल्या साऱ्या जगाची बित्तंबातमी त्यांना ठाऊक असते".
त्यांचं जाऊद्या. सोफ्या वर या.
बाळूमामा सोफ्या वर बसले.
"सोफा चांगला नरम होता. बरा वाटला. घरी घेऊन आलॊ. ही म्हणाली कितीला आणला. घ्या. सोफा चांगला खराब याकडे काही लक्ष नाही. सरळ सरळ किंमत?"
तुम्ही आणला तर चांगला असेलच की.
"असं तुम्हाला वाटतं. आमच्या मंडळीने आता पर्यंत मी आणलेल्या एका वस्तूच कौतुक केलं तर शप्पथ!"
वहिनीला तुम्हीच आणलं असेल ना? त्याचं तरी कौतुक असेल की?
" ते ही नाही. सासरेबुवाच कौतुक करत म्हणते सतत, 'मामंजीना एका नजरेत कळलं ही सून म्हणून आपल्या घराची कित्ती शोभा वाढवेल. नाहीतर तुम्ही? समोरच्या बशीकडे सगळं ध्यान."
बशीत असं काय होतं?
"साहेब, आता तुम्ही पण आमची फिरकी घेता?"
चला आपण सोफा पुराण चालू ठेऊ.
"मी म्हटलं, पंधरा हजार. पंचवीस सांगत होता पण आपण भाव करण्यात पटाईत बरं कां. एकदा पंधरा सांगितले त्यात एक रुपया कमी-जास्त होणार नाही असं ठणकावून सांगितलं."
हो पंचवीसचा पंधरा म्हणजे फायदाच झाला की.
"म्हणते, आत्ताच्या आत्ता परत करा. मी दहा हजाराच्या वर एक रुपया मोजला नसता."
मोजता येत नाही कां? मला वाटलं चांगली शिकली-सवरलेली आहे.
"जोक मारू नका. सगळ्यांना पुरून उरेल म्हणतो मी."
पुढं सांगा.
"म्हणाली 'तुम्हाला अक्कल अजिबात नाही. नुसते गाढव आहात. व्यवहारज्ञान तर अजिबात नाही'. मी ओरडणार इतकयात ती म्हणाली, 'त्या ट्रम्पना बघा. न विचारात युद्ध सुरु केलं आणि आता युद्धाचा खर्च मागतो म्हणे आखाती देशाकडे! त्यांचा नुसता मामा केला की हो. याला म्हणतात हुशारी."
असं म्हणाली?
"मी पण एकदम भांबावून गेलो. घरगुती भांडणात एकदम ट्रम्पची एन्ट्री! म्हणाली असं काय बघता? आम्ही पण टीव्ही पाहतो की. एकदम हुशार आहे हो तो. मागे म्हणे युरोपच्या देशांना सांगितलं, रशियाचं तेल नका घेऊ.त्या तेलावर बंदी टाकू. मी देतो तुम्हाला तेल. बिचाऱ्यानी रशियाच्या स्वस्त तेलाला टाटा केला आणि आता अमेरिकेचं महागडं तेल घेतात. युक्रेन भांडणात स्वतःचा कसा फायदा करून घेतला त्यानं. नाहीतर तुम्ही. ट्रम्प सारखी हुशारी असती तर हा सोफा घरात चालत आला असता पैशे न मोजता."
मला ट्रम्पच्या लेवलचा हुशार माणूस आहे असं म्हणाली? मी असा फाटक्या फुटका वाटतो कां? हा सोफा मी ....
मला पुढं बोलणं सुचत नव्हतं.
"ते तुम्ही मनावर घेऊ नका. तुमच्या विषयी तिला अनंत आदर आहे."
मी शांत. ट्रम्पची माझी तुलना? माझा मूड पाहून बाळूमामा हळूच म्हणाले,
"खर म्हणजे तिचा एवढा अभ्यास नाही. तुमची कुणाशी कशी तुलना होऊ शकते."
आता जरा बरं वाटलं.
"आता हेच बघा ना. माझी अक्कल काडली, गाढव म्हणाली, पण मला काही काही वाईट वाटलं नाही. ट्रम्पच्या लेवलचा हुशार माणूस मला नाही म्हटलं तिने."
" हे ही नसे थोडके."
No comments:
Post a Comment